जीवितापेक्षा व्यसन ठरतेय वरचढ!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jugar

फिजिकल डिस्टन्सिंग'चे नियम आणि संसर्गाची भीती फाट्यावर मारून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने जुगाराचे अड्डे गर्दीने बहरल्याचे आढळल्याने ती चिंतेची बाब ठरली आहे.

जीवितापेक्षा व्यसन ठरतेय वरचढ! 

शिरपूर : "कोरोना'च्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रशासन शक्‍य त्या उपाययोजना करीत आहे. "लॉक डाउन' जाहीर करून नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही जणांना जीविताच्या भीतीपेक्षाही व्यसन अधिक गरजेचे भासत असल्याचे थाळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले. "फिजिकल डिस्टन्सिंग'चे नियम आणि संसर्गाची भीती फाट्यावर मारून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने जुगाराचे अड्डे गर्दीने बहरल्याचे आढळल्याने ती चिंतेची बाब ठरली आहे. 
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर थाळनेर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. रविवारी तरडी- भावेर (ता. शिरपूर) शिवारातील शेतामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 93 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमारे दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. सोमवारी सावळदे (ता. शिरपूर) गावात छापा टाकून जुगार खेळणाऱ्या संशयितांना पकडण्यात आले. तेथे एक लाख 58 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच दिवशी घोडसगाव येथील जुगार अड्ड्यावरही कारवाई झाली. या तिन्ही कारवायांमध्ये सुमारे 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग असे कोणतेही नियम न पाळता हे जुगारी बिनधास्त जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जुगारासह साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हाही संबंधितांवर दाखल झाला. 

जुगारासाठी 40 किलोमीटर प्रवास 
जुगार अड्ड्यांवर सापडलेले संशयित केवळ परिसरातील नसून त्यात देवभाने, शिंदखेडा येथील जुगाऱ्यांचाही समावेश आहे. एकीकडे जिवाच्या भीतीने लोक घराबाहेर पडत नसताना दुसरीकडे केवळ जुगाराचे व्यसन काहींना 35 ते 40 किलोमीटर अंतरावर खेचून आणत असल्याचे विदारक वास्तव यानिमित्ताने उघडकीस आले. जुगारातून "कोरोना'चा संसर्ग पसरल्यास किती अनर्थ घडेल याचा विचारही संबंधितांनी केला नाही. विशेष म्हणजे जुगार अड्ड्यांवर सापडलेल्या संशयितांमध्ये काही तालेवार, सुशिक्षित मंडळीही आहेत. त्यामुळे स्वतःच्या जीवापेक्षा व्यसन अधिक महत्त्वाचे मानणाऱ्यांचे करायचे तरी काय, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला. 

अवैध धंद्यांचे स्तोम संपवूया 
तालुक्‍यातील आमोदे गावाचा अपवाद वगळता ग्रामीण भाग अद्याप "कोरोना' संसर्गापासून दूर आहे. मात्र, निव्वळ जुगाराची हौस फेडण्यासाठी बाहेरगावांहून येणाऱ्या जुगाऱ्यांकडून आपण किती मोठा धोका पत्करतो आहोत, याचे भानही राखायला हवे. प्रशासनाचे प्रयत्न, त्यांना जनतेची साथ, अहोरात्र राबणारी यंत्रणा हे सर्वच मातीमोल ठरू द्यायचे नसेल, तर अशा गर्दी जमा होणाऱ्या अवैध धंद्यांच्या उच्चाटनासाठी जनतेनेही सिद्ध व्हायला हवे, हेच या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. 

कारवाई झालेल्या जुगार अड्ड्यांवर ज्या पद्धतीने जुगारी बसले होते, ते पाहता कोरोना संसर्गाचा प्रसार सहजच होऊ शकतो. आपल्या व कुटुंबाच्या जीवितापेक्षा कोणतेही व्यसन मोठे नाही याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. पोलिस त्यांचे कर्तव्य करीतच आहेत; पण जनतेनेही संपूर्ण समाजाचे आरोग्य धोक्‍यात आणणाऱ्या अशा प्रवृत्ती व अवैध व्यवसाय उखडून टाकण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. 
- सचिन साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, थाळनेर, ता. शिरपूर 

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top