पीपीई सूटच्या उत्पादनातून शिरपूर कोरोनायोद्धा..."लॉकडाउन'मध्ये हजार जणांना रोजगार ! 

पीपीई सूटच्या उत्पादनातून शिरपूर कोरोनायोद्धा..."लॉकडाउन'मध्ये हजार जणांना रोजगार ! 

शिरपूर: बिसलेरी पाणीपुरवठा, वॉटरमीटर, जलसंवर्धनाचा अनोखा पॅटर्न, बेबी टॉयलेटसह स्वच्छतेला प्राधान्य, औद्योगिक व सहकार क्षेत्रात भरारी, रोजगारनिर्मिती, "एज्युकेशनल हब' म्हणून नावारूपाला आलेल्या शिरपूरने "कोविड'च्या लढाईतील "पीपीई सूट'चे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे देशाच्या नकाशावर पुन्हा शिरपूर चमकले आहे. तसेच एकीकडे कामगारकपात होत असताना शिरपूरला भरतीतून हजार कामगार "कोरोनायोद्धा' म्हणून कार्यरत झाले आहेत. 


कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय उपचार क्षेत्रातून प्रचंड मागणी असलेल्या "पीपीई सूट' निर्मिती क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेचा सामना करीत तांडे (ता. शिरपूर) येथे कृष्णा कॉटेक्‍स उद्योग पाय रोवून उभा आहे. त्यात प्रतिदिन सरासरी साडेतीन हजारांच्या संख्येने उत्पादित दर्जेदार "पीपीई सूट'ची देशभरातून व्यापक मागणी नोंदविण्यात आली आहे. या निर्मितीत सक्रिय रिलायन्ससारख्या बड्या उद्योगांशी स्पर्धा करण्याचा दृष्टिकोन ठेवून कंपनीचे कार्यकारी संचालक चिंतन अमरिशभाई पटेल, तपन पटेल कृष्णा कॉटेक्‍समध्ये गुणवत्तेवर लक्ष ठेवत आहेत. 

अमरिशभाईंचे योगदान 
माजी शालेय शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांच्या दूरदर्शी निर्णयातून शिरपूर-चोपडा रस्त्यावर प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या परिसरात भव्य टेक्‍स्टाइल पार्क साकारले. त्यातील दिसान ग्रुपतर्फे कृष्णा कॉटेक्‍स उद्योग चालविला जातो. कोविड-19 चा उद्रेक झाल्यानंतर देशात वैद्यकीय क्षेत्रातून उपचारासाठी "पीपीई सूट'ची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली. कृष्णा कॉटेक्‍समध्ये आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार आयात केलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री असून, तिच्या प्रणालीत योग्य ते फेरबदल करून "पीपीई सूट'चे उत्पादन सुरू झाले. वैद्यकीय नियंत्रण यंत्रणांच्या सर्व निकषांवर उतरणारे "पीपीई सूट' तयार करण्यात कृष्णा कॉटेक्‍स यशस्वी ठरले. या सूटचे परीक्षण नामवंत हॉस्पिटल्स, कोविड उपचार केंद्रातील तज्ज्ञांमार्फत झाले. सर्वांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यानंतर विपणनाला सुरवात झाली. अल्पावधीतच देशभरातून मागणी नोंदविण्यात आली. सांताक्रूझ (मुंबई) येथील कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसतर्फे विपणनाचे काम सुरू आहे. 

रोजगारनिर्मितीला बळ 
उत्पादनाच्या मागणीमुळे कंपनीतर्फे "लॉकडाउन'च्या कालावधीत कामगारांची नव्याने भरती करण्यात आली. स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याचे धोरण कंपनीने कायम ठेवले. त्यामुळे शेकडो कुटुंबांना आधार मिळाला. संकटकाळात रोजगारनिर्मितीतून येथील युवकांचे मनोधैर्य कायम राखणारी कृष्णा कॉटेक्‍स सर्वच उद्योगांसाठी आदर्श ठरली आहे. 

पीपीई सूटची वैशिष्ट्ये 
कृष्णा कॉटेक्‍सद्वारे उत्पादित पीपीई सूटमध्ये प्रीमियम, नॉन वुव्हन सूट (70 जीएसएम व 90 जीएसएम) हे एकदा वापरावयाचे व सुपर प्रीमियम (धुऊन पाच ते सात वेळा वापरण्यायोग्य) असे प्रकार आहेत. डोक्‍यापासून तळपायापर्यंत पूर्णतः धूळ, जंतू, जलबिंदू, रक्तबिंदूरोधक आवरण असलेले हे सूट न फाटणारे आहेत. सूट तयार करताना प्रत्येक शिवणबिंदूवर टेप लावून अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. 


अमरिशभाईंनी नेहमीच सर्वोच्च गुणवत्तेचा आग्रह धरला. त्यामुळे जगातील उत्कृष्ट यंत्रसामग्री आम्ही वापरतो. "डब्ल्यूएचओ', "आयसीएमआर'चे नियम, निकष पाळतो. पीपीई सूटचा दर्जा उत्तम असल्याचा अभिप्राय देशातून मिळतो आहे. हे गुणवत्तेचे प्रतीक आहे. उत्पादनात तालुक्‍याच्या भूमिपुत्रांना संकटकाळात रोजगार देऊ शकलो, ही पटेल ग्रुपसाठी अभिमानाची बाब आहे. 
-चिंतन अमरिशभाई पटेल 
कार्यकारी संचालक, कृष्णा कॉटेक्‍स 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com