ब्रेकिंग न्युज : शिरपुरचे नगरसेवक तपन पटेल यांचा कार अपघातात मृत्यू !

सचिन पाटील 
Wednesday, 30 September 2020

एनएमआयएमएस कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कार (एमएच 18 एएक्स 8) च्या इंजिनचा स्फोट झाला.

शिरपूर  : येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी मध्यरात्री एकला अपघाती निधन झाले. सावळदे (ता.शिरपूर) येथील एनएमआयएमएस कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कार (एमएच 18 एएक्स 8) च्या इंजिनचा स्फोट झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने त्यांना येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू केल्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले.

शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून गेले होते. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदी पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. राज्यसभेचे माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र, माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होत.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Shirpur corporator Tapan Patel dies in car accident