स्वॅब देता देता कोविड सेंटरमध्ये रंगतो काव्यमय समुपदेशन, कुठे वाचा ! 

सचिन पाटील 
Wednesday, 16 September 2020

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच समुपदेशनाद्वारे कोरोनाची भीती काढल्यास उपचारांना अधिक प्रतिसाद मिळतो. रुग्ण लवकर रोगमुक्त होतो.

शिरपूर : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील स्वॅब सेंटर...बाहेरच्या हॉलमध्ये स्वॅब देण्यासाठी आलेले नागरिक सुरक्षित अंतरावर बसले आहेत. त्यांच्या कानावर ओळी पडतात…‘कौन कहता है की, आसमान मे सुराख नही होता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारो...’ हॉस्पिटलमधील वातावरण बदलते. साशंक नागरिकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास फुलू लागतो. कोविड म्हणजे काय, त्याची लक्षणे, घरात आणि बाहेर वावरतांना घ्यावयाची काळजी, स्वॅब दिल्यानंतर घ्यावयाची दक्षता याबाबत काव्यमय भाषेत डॉ. कपिल पाटील बोलत राहतात. 

शिरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून रुग्णसंख्या २२०० पेक्षा अधिक झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे प्रमाण अधिक आहे. अशा पार्श्वभूमीवर स्वॅब देणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयातील कोविड उपचार केंद्रात उपचारासोबत कमालीचे प्रभावी समुपदेशनही मिळत असल्याचा सुखद अनुभव येतो. त्यामागे डॉ. कपिल पाटील व सहकाऱ्याचे मोठे योगदान आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच समुपदेशनाद्वारे कोरोनाची भीती काढल्यास उपचारांना अधिक प्रतिसाद मिळतो. रुग्ण लवकर रोगमुक्त होतो. शिवाय डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी घ्यावयाच्या काळजीबाबतही रुग्ण सावध होतात. उपजिल्हा रुग्णालयातील कोविड उपचार केंद्रात थेरपीचा वापरही मोलाचा ठरला आहे. 

वैद्यकीय अधीक्षक पदावर पदोन्नती 
डॉ. कपिल पाटील चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातील रहिवाशी आहेत. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. मूळची साहित्यिक प्रकृती, वाचनाचा व्यासंग असल्यामुळे समुपदेशनात मराठी काव्य, उर्दू शेरोशायरी, सकारात्मक वचने यांचा प्रभावी वापर ते करतात. एम.डी.(फोरेन्सिक) असलेल्या डॉ. कपिल पाटील यांच्या कामाचा उरक कोविड १९ च्या संसर्गादरम्यान प्रामुख्याने दिसून आला. अनेक रुग्ण आणि त्यांचे नातलग घरी जातांना त्यांची आवर्जून भेट घेऊन आभार मानतात. संसर्गग्रस्तांच्या वॉर्डात तपासणीसाठी गेल्यावर त्यांच्याशी संवाद साधणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. डॉ. पाटील यांना नुकतीच वाशी (जि.उस्मानाबाद) येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली. लवकरच ते उपजिल्हा रुग्णालयाचा चार्ज सोडतील. या वास्तूला मात्र कोरोनाकाळातील त्यांचे प्रभावी समुपदेशन सदैव स्मरणात राहील. 

कोरोनापेक्षाही त्याची भीती अधिक घातक ठरते. उपचारांपूर्वीच रुग्णांचे समुपदेशन केल्यास अधिक प्रभावी ठरते. सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचारांची पराकाष्ठा केली आहे. रुग्ण बरा होऊन घरी जातो, तेव्हा वैद्यकीय शिक्षण घेतल्याचे खरेखुरे समाधान लाभते. 
डॉ. कपिल पाटील, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्‍हा रूग्णालय, शिरपूर  

 

सपांदन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur Covid Center, Dr. Corona counsels the affected and the suspects through poetry.