सातपुड्याच्या कुशीत फुलली सेंद्रिय आवळ्याची शेती

सचिन पाटील 
Friday, 2 October 2020

सेंद्रिय खताचा वापर, आंतरपीक घेतल्यामुळे अतिरिक्त खर्च कमी झाला. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर टाळून केवळ नैसर्गिक पद्धतीने गांडूळ व पालापाचोळ्यापासून तयार केलेले खत देऊन झाडाची प्रतिकारशक्ती वाढविता येते.

शिरपूर : ‘केल्याने होत आहे रे,’ असे म्हणत पारंपरिक पिकांचा मार्ग सोडून नावीन्याचा ध्यास घेतलेले युवक एकत्र आले. त्यांनी कृषिगट स्थापन केला. शासनासह स्वयंसेवी संस्थांचे मार्गदर्शन मिळविले. कामाला सुरवात केली. त्यांचे अथक परिश्रम आणि नियोजनातून सातपुड्याच्या कुशीत न्यू बोराडी शिवारात सेंद्रिय आवळ्याची शेती बहरली आहे. चार वर्षांपासून हा गट सतत विक्रमी उत्पादन घेत असून, स्थानिक बाजारपेठेत आवळ्याला मोठी मागणी आहे. उत्पादक शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. 

दहा वर्षांपूर्वी न्यू बोराडी येथील युवक शेतकरी प्रेमसिंग पावरा, प्रताप पावरा, कुवरसिंग पावरा, विजय पावरा, कमलसिंग पावरा, नाना पावरा, सुदाम पावरा, फोज्या पावरा, संतोष पावरा एकत्र आले. फळपिकातून उत्पन्नाचा संकल्प सोडल्यानंतर जमिनीचा पोत तपासून आवळा पिकाची निवड केली. महाराष्ट्र विकास मंडळ व कृषी विभागातर्फे या शेतकऱ्यांनी कृषी दौरा केला. पुणतांबा (जि. नगर) येथील आवळ्याची शेती पाहून त्यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याचे ठरविले. 

बायफ मित्रा संस्थेच्या सहकार्याने २० एकरांवर आवळ्याची लागवड करण्यात आली. कृषी अधिकाऱ्यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. दहा बाय दहा मीटर अंतरावर रोपे लावली. पहिल्या वर्षी एका झाडाला पाच किलो, दुसऱ्या वर्षी दहा किलो, तिसऱ्या वर्षी ४० किलो, चौथ्या वर्षी ८० किलो व त्यानंतर १०० ते १२० किलो आवळा मिळू लागला. ६५ ते ७० ग्रॅम वजनाचा एक आवळा असून, स्थानिक बाजारपेठेत २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. 

आवळ्याचे फायदे 
आवळ्याच्या झाडांना कमी पाणी लागते. उन्हाळ्यात पाणी न देताही झाड जगते. खोडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मोरचूद, चुना यांचे द्रावण करून ते एक दिवस भिजवून झाडाच्या बुंध्यापासून पाच फूट अंतरापर्यंत लावल्यास प्रभावी परिणाम जाणवतो. सेंद्रिय खताचा वापर, आंतरपीक घेतल्यामुळे अतिरिक्त खर्च कमी झाला. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर टाळून केवळ नैसर्गिक पद्धतीने गांडूळ व पालापाचोळ्यापासून तयार केलेले खत देऊन झाडाची प्रतिकारशक्ती वाढविता येते. कडुनिंब अर्क, गोमूत्र फवारणी, निंबोळी अर्क यांचा वापर होतो. त्यामुळे खर्च कमी होऊन नैसर्गिक पद्धतीने झाडे वाढविणे शक्य होते. आवळ्याची लागवड हलक्या ते मध्यम जमिनीत केली जात असल्यामुळे अशा जमिनीचा पोत आणि कस टिकविण्यासाठी चवळी, उडीद, मूग, वाटाणा, हरभरा आदी आंतरपिके घेऊन उत्पन्नवाढ शक्य होते. 

दर वर्षी आवळ्याचे चांगले उत्पादन मिळते. मागणीही बऱ्यापैकी असते. मात्र, स्थानिक मार्केटला अपेक्षित भाव मिळत नाही. नाइलाजाने किरकोळ विक्री करावी लागते. त्यामुळे शासनाने आवळा प्रक्रिया उद्योगांबाबत मार्गदर्शन केल्यास अधिक उत्पन्न मिळविणे शक्य होईल. इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल. 
-प्रेमसिंह पावरा, शेतकरी.
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Shirpur Farmers are cultivating amla in the Satpudya mountain range through agricultural groups