esakal | अखेर ‘त्या’वस्तीला हक्काचं नाव मिळालं 
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर ‘त्या’वस्तीला हक्काचं नाव मिळालं 

रोजगारासाठीची भ्रमंती टळली. कसण्यासाठी जमीन मिळाली. स्वप्नापलीकडली दौलत मिळाल्याने संपूर्ण वस्ती आनंदात न्हाऊन निघाली. भूपेशभाई पटेल यांनी मुलगी द्वेतासह बंधाऱ्याला जुलैमध्ये भेट दिली.

अखेर ‘त्या’वस्तीला हक्काचं नाव मिळालं 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर: ‘आम्हाला हवं ते सारं मिळतंय. शेती झाली, पाणी मिळालं, रस्ताही झाला. आता वस्तीला नाव मिळाल्याने आम्हाला ओळखही प्राप्त झाली’, असे प्रतिपादन काशीनाथ पावरा यांनी केले. हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. बेघर, भूमिहीन मजूर ते बागायती शेतीचा मालक, या प्रवासात सुखाचा विसावा गवसल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. 


आंबे (ता. शिरपूर) या दुर्गम गावाबाहेर वसलेल्या ३२ उंबऱ्यांच्या वस्तीचे काशीनाथ पावरा प्रमुख आहेत. ओसाड नाल्याकाठी मुरमाड जमिनीवर त्यांच्यासारख्या आणखी काही भूमिहीन आदिवासींनी झोपड्या उभारल्या. रोजगाराचे स्थायी साधन नव्हते म्हणून दुसऱ्यांच्या शेतात हंगामी मजूर म्हणून राबायचे. रोजगार संपला की पाणी पिऊन दिवस ढकलायचा, हाच या वस्तीतील बहुतेकांचा आयुष्यक्रम होता. 

वस्तीचे नशीब फळफळले 
माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, प्रियदर्शनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आंबे येथील नाल्यांवर शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याची मालिका साकारली आणि या वस्तीचे नशीब फळफळले. बंधारे पाण्याने भरले. बंधाऱ्यातून काढलेला गाळ पसरून मुरमाड, पडीक जमीन लागवडयोग्य झाली. बंधाऱ्यातून शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध झाले. बंधाऱ्याच्या कामासाठी तयार केलेला रस्ता वाहतुकीसाठी मिळाला. वीज मिळाली.

रोजगारासाठीची भ्रमंती टळली. कसण्यासाठी जमीन मिळाली. स्वप्नापलीकडली दौलत मिळाल्याने संपूर्ण वस्ती आनंदात न्हाऊन निघाली. 
भूपेशभाई पटेल यांनी मुलगी द्वेतासह बंधाऱ्याला जुलैमध्ये भेट दिली. त्यावेळी वस्तीतील रहिवाशांनी वस्तीला नाव मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. द्वेता पटेल यांनी ग्रामविकासाच्या विविध संकल्पनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. वडील भूपेशभाई पटेल यांच्याकडे आग्रह धरून वस्तीतील बेरोजगारांसाठी मत्स्योत्पादन व फळबाग प्रकल्पासाठी मदतीचे आश्वासन घेतले. त्यांच्या दृष्टिकोनामुळे प्रभावित झालेल्या वस्तीतील कुटुंबांनी आपल्या वसाहतीचे नामकरण ‘द्वेता पटेलनगर’ असे निश्चित केले. तसा फलकही तयार केला. 

मंगळवारी (ता. १७) आमदार काशीराम पावरा, नगरसेवक तपन पटेल, शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, आंबे विकास संस्थेचे अध्यक्ष आर. आर. माळी, भालेराव माळी, राजेश सोनवणे आदींच्या उपस्थितीत द्वेता पटेलनगरच्या फलकाचे अनावरण झाले. येत्या काळात ग्रामविकासाच्या विविध योजना राबवून मॉडेल कॉलनी म्हणून या वसाहतीचा विकास करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार पावरा यांनी दिले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top