
शेतकऱ्यांना निलगिरीच्या शेतीतून 30 महिन्यात प्रति हेक्टर पाच लाखापेक्षा अधिक रुपये मिळतात. एका लावणीतून निलगिरीची तीन वेळा तोडणी होते.
सोनगीरः लहरी व अनियमित पाऊस, त्यातील उत्पादनाला भाव नाही. त्यातच कायम स्वरूपी पाण्याच्या स्त्रोतांची कमतरता असल्याने शेतकरी कायम नुकसानीतच राहतात. यापार्श्वभुमीवर निलगिरीच्या झाडांची लागवड फायदेशीर असून अमळनेर तालुक्यातील अनेक शेतकरी दर्जेदार निलगिरीचे उत्पादनाकडे वळत आहेत. एका हेक्टरमधून शेवटी सुमारे 22 लाख रुपये उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे उष्ण, समशीतोष्ण वातावरणात ती चांगली वाढतात आणि खूप पाण्याची म्हणजे उसाएवढ्या पाण्याची गरज नसते.
निलगिरीच्या टेकड्यांवरील वृक्ष म्हणून निलगिरी नाव पडले. पानांपासून औषधी तेले, खोडाच्या लगद्यापासून कागद, लाकडापासून जहाज बांधणी, रेल्वे स्लीपर्स आदी उपयोग होतो. निलगिरी 90 मीटरपर्यंत वाढतो. खोडावरील त्वचा तुकड्या तुकड्यात गळून पडतात. त्यापासून कागद तयार केले जाते. याशिवाय पाने व खोडाची छाटणी करून विक्री केली जाते. दरम्यान एका हेक्टरमधून आपल्या इच्छेप्रमाणे झाडे लावू शकतो व आंतरपीकही घेऊ शकतो.
शेतकऱयांना फायदा
शेतकऱ्यांना निलगिरीच्या शेतीतून 30 महिन्यात प्रति हेक्टर पाच लाखापेक्षा अधिक रुपये मिळतात. एका लावणीतून निलगिरीची तीन वेळा तोडणी होते. सर्व खर्च जाऊन शेतकरी 22 लाख रुपये कमावू शकतात. खानदेशात विशेषतः अमळनेर तालुक्यातील दोधवद परिसरातील अनेक शेतकरी उसाबरोबरच निलगिरीचे मोठ्याप्रमाणात उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांनी गुजरातमधील एका कागदाच्या कारखान्याशी करार केला असून कंपनीचे कर्मचारी शेतात येऊन अडीच फूटाचे झाड बियाणे म्हणून देतात व मार्गदर्शन करतात. दोधवद येथील सरपंच, निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव दोधू भोई आता शेतीत रमले असून त्यांनी निलगिरीचा प्रयोग राबविला आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी निलगिरीचे उत्पन्न घेतल्यास अन्य पिकातील नुकसान भरपाई होऊ शकते.
एक कोटी मिळाले उत्पन्न
सहा एकरात निलगिरी लावण्याला 75 हजार रुपये खर्च आला. त्यानंतर 15 वर्षे कोणताही खर्च लागत नाही. दरम्यान अडीच वर्षांत एकदा असे 15 वर्षांत सहा तोडणी करता येते. एका तोडणीत 20 लाखाहून अधिक उत्पन्न मिळते, असे 15 वर्षांत सहा तोडणी केल्याने एक कोटी वीस लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी निलगिरीचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा असे शेतकरी साहेबराव भोई म्हणाले.
संपादन- भूषण श्रीखंडे