
सध्या कोरोनामुळे अनेक जण मृत्यू पावत असताना काही कुटुंबे बरबाद होत आहेत. मात्र अमळगांवमधील आई, वडील व मुलगा यांच्यापैकी कोणीही कोरोना बाधित नसताना मयत झाले.
सोनगीर ः नियती कधी कधी किती क्रूर होऊ शकते याचा प्रत्यय अमळगाव (ता. अमळनेर) येथील चौधरी कुटुंबाला आला. दोन महिन्यात एकाच घरातील आई, वडील व कर्ता मोठा मुलगा अशा तिघांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमळगाव येथील शेतकरी कुटुंबातील दयाराम नारायण चौधरी (वय ८५) यांचे १५ ऑगस्ट २०२०ला निधन झाले. त्यांचे गंधमुक्त तथा उत्तरकार्य झाल्यानंतर नातेवाईक आपापल्या गावी पोहचत नाही, तोच त्यांची पत्नी दुर्गाबाई दयाराम चौधरी (वय ७९) यांचेही १२ सप्टेंबरला अल्प आजाराने निधन झाले. पुन्हा नातेवाईक मंडळी अमळगांवला पोहचली. आईबाबत सर्व सोपस्कार पूर्ण झाले. नातेवाईक आपापल्या घरी पोहचले. गेल्या महिन्यांपासून कामे ठप्प पडलेली असताना आता नेहमीचे जीवन सुरू होण्याची अपेक्षा असताना दयाराम चौधरी यांचा कर्ता मुलगा भटू दयाराम चौधरी (वय ५२) यांचे काल बुधवारी (ता. ७) रात्री नऊच्या सुमारास मुंबईत जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचावर गुरुवारी उल्हासनगर येथे अंत्यसंस्कार झाले. भटू चौधरी हे उल्हासनगरमध्ये फर्निचर कॉन्ट्रक्टर होते. त्यांच्यामागे पत्नी मीना व दोन मुले चेतन व प्रशांत आहेत. त्यांचा एक भाऊ गणेश चौधरी उल्हासनगरमध्ये पोलिस व प्रकाश चौधरी कल्याणला शिक्षक आहेत. सध्या कोरोनामुळे अनेक जण मृत्यू पावत असताना काही कुटुंबे बरबाद होत आहेत. मात्र अमळगांवमधील आई, वडील व मुलगा यांच्यापैकी कोणीही कोरोना बाधित नसताना मयत झाले. त्यामुळे आश्चर्यसह हळहळ व्यक्त होत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे