अन्नदान करायचय ; तर दोन वर्षे थांबा  

एल. बी. चौधरी 
Tuesday, 24 November 2020

भंडाऱ्याचा खर्च देण्यासाठी भक्तांची अहमहमिका लागते. त्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकींग केली जाते. दोन वर्षांनंतर तुम्हाला भंडारा महाप्रसाद वाटप करता येतो.

सोनगीर ः मंदिर उघडण्यास परवानगी मिळाल्यानंतर येेथील एन. जी. बागूल हायस्कूलजवळच्या वस्तीतील श्री संत गुलाबबाबांच्या मंदिरात दर पौर्णिमेला होणारा भंडारा कार्यक्रमात अन्नदान करण्यासाठी भाविकांच्या अक्षरशः रांगा लागल्या असून आज बुकींग केले तर किमान दोन वर्षांनी तुम्हाला ती संधी मिळेल अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे सर्वच भक्त गरीब असूनही त्यांचेे हृदय विशाल आहे. सन 2016 मध्ये भक्तांनी जमवलेल्या आठ लाख 60 हजार रुपयात मंदिर बनले असून मुर्तीला अडीच लाख रुपये खर्च आला आहे. 

आवश्य वाचा-  महाविकास आघाडीच्या नेत्यांना दाखवावे लागणार एकीचे बळ

काटेल ता. बुलढाणा येथे संत गुलाब बाबांचे भव्य आश्रम असून येथील शेकडो भाविक दरवर्षी जातात. येथे व परिसरात त्यांचे हजारो भाविक आहेत. दररोज मंदिरात पूजाअर्चा, आरती होतेच; परंतू दर महिन्याला पौर्णिमेला किर्तन व भंडारा कार्यक्रम होतो. भंडाऱ्याचा खर्च देण्यासाठी भक्तांची अहमहमिका लागते. त्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकींग केली जाते. दोन वर्षांनंतर तुम्हाला भंडारा महाप्रसाद वाटप करता येतो. हजारो भाविक भंडाऱ्याचा लाभ घेतात.

 

अन्नदानाचे कार्य सुरूच

कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून मंदिर बंद असले तरी मोजक्या गरीबांना त्यांच्या भंडारा देण्यात आला. अजूनहीपौर्णिमेला कोरोनाचे नियम पाळून गरीबांसाठी भंडारा  दिला जातो..दरम्यान दरवर्षी तीन डिसेंबरला मंदिराचा वर्धापनदिन साजरा केला जातो. त्यानिमित्त सकाळी महाविष्णूयाग व श्री.गुलाबबाबा चरित्र पारायण, सायंकाळी शोभायात्रा व पादुका मिरवणूक, रात्री कीर्तन दुसर्‍या दिवशी सकाळी गोपाळकालाचे कीर्तन व भंडारा कार्यक्रम होतो. 

मंदिर समितीचे अध्यक्ष सुरेश जोगी, उपाध्यक्ष सुनील बोरसे, सचिव राजेंद्र भटू वाणी, खजिनदार सुनील धनगर, सदस्य गोपीचंद बैसाणे, सुरेश रामजी माळी, पांडुरंग सैंदाणे, दुर्गादास धनगर, उषाताई भरत जाधव संतोष दयाराम पाटील, रामकृष्ण नारायण पाटील आदी मंदिराची देखभाल करतात. 
 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songire two years waiting for food donation at Saint Gulab Baba's temple