esakal | पुन्हा सुरू झाली ऑनलाईन शिक्षणाची चर्चा !

बोलून बातमी शोधा

पुन्हा सुरू झाली ऑनलाईन शिक्षणाची चर्चा !

ऑनलाइन शिक्षण सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे अनेक वेळा पुढे आले होते. अनेक सामाजिक संस्थांनी खाजगीरित्या सर्वे करून राज्यभर अभ्यास केला होता.

पुन्हा सुरू झाली ऑनलाईन शिक्षणाची चर्चा !
sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा : ऑनलाईन शिक्षणाची अध्यापन पद्धती व त्यातील आलेली आव्हाने या विषयावर संशोधन करण्यासाठी कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या व शिक्षण सुरू ठेवणाऱ्या शहरी ,ग्रामीण तसेच आदिवासी अश्या सर्वच भागातील शिक्षकांकडून यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन ज्ञान प्रबोधिनी अर्थात यशदा मार्फत प्रश्नावली भरून घेतली जात आहे. या प्रश्नावलीत शिक्षकांनी केलेले प्रयत्न व त्यातील आलेल्याअडचणी देखील मांडण्याची सोय देण्यात आली आहे. मात्र शंभर टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देता आले नसल्याचे अनेक शिक्षण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणातील धोके अजून पूर्णपणे मिटलेले नाहीत. त्यात शिक्षक प्रश्नावली भरत असल्याने पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षणाची चर्चा सुरू झाली आहे.

कोरोनामुळे मार्च 2020 पासून शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष शिक्षण देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. त्यात नाही म्हणायला ऑनलाइन शिक्षण देण्याचे कार्य शिक्षकांनी सुरू ठेवले होते.मात्र सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचू शकत नसल्याच्या मर्यादा शिक्षकांना माहीत होत्या. नव्हे तर तशी आकडेवारी देखील शिक्षकांनी कोरोना काळात ऑनलाइन भरली होती. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण अपरिहार्यपणे राबवावे लागले होते. 
दुसरीकडे राज्य शिक्षण विभागाने देखील अनेक कार्यक्रमांची सुरुवात केली होती. त्यात टीली मिली , शाळा बंद शिक्षण सुरू , स्वाध्याय उपक्रम , बालचित्रवाणी असे अनेक कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. या कार्यक्रमांना प्रतिसाद देखील बऱ्यापैकी मिळत होता.मात्र ऑनलाइन शिक्षण सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे अनेक वेळा पुढे आले होते. अनेक सामाजिक संस्थांनी खाजगीरित्या सर्वे करून राज्यभर अभ्यास केला होता. त्यात ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे दिसून आले होते. 

शिक्षक गुगल फाॅर्म भरण्यात व्यस्त

मात्र आता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन ज्ञान प्रबोधिनी अर्थात यशदा मार्फत याच ऑनलाइन शिक्षणाची अध्यापन पद्धती व त्यातील आव्हाने या विषयांवर शिक्षकांकडून प्रश्नावली भरून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी गुगल फॉर्म द्वारे प्रश्‍न शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात अनेक प्रश्नांची उत्तरे विचारुन राज्यातील ऑनलाईन शिक्षणाची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या प्रश्नावलीत शाळेच्या प्रकार कोणता? शाळा शहरी , ग्रामीण की आदिवासी क्षेत्रात आहे. शाळेचे माध्यम कोणते? कोणत्या विषयांचे ऑनलाइन अध्यापन केले? विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरू होता का? शिक्षकांनी कोणते विषय ऑनलाइन रित्या शिकवले? कोणत्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवले ? प्राथमिक ,माध्यमिक अथवा दोन्ही , शाळेने शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी कोणत्या सुविधा पुरवल्या? शाळेने ऑनलाइन शिक्षणासाठी प्रशिक्षण दिले का? ऑनलाइन साठी कोणत्या साधनांचा वापर केला ? ऑनलाईन शिक्षणासाठी कोणते सॉफ्टवेअर अथवा ॲप्लिकेशन वापर केला? कोणते सॉफ्टवेअर वापरले? अध्यापन दरम्यान कोणत्या अडचणी आल्या? अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या? ऑनलाईन शिक्षण देण्याची क्षमता शिक्षकांमध्ये आहे असे नमूद करणारे प्रश्न? ऑनलाईन अध्यापनाची कोणती पद्धती वापरली ? किती विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लास ला हजेरी लावली? आपल्या वर्गातील एकुण विद्यार्थी संख्या किती? 

प्रश्नांचा भडिमार
किती आठवडे आपण ऑनलाईन अध्यापन केले ? किती तास आपण ऑनलाईन अध्यापन केले ? अध्यापनात कोणती बाब विद्यार्थ्यांना देता आली नाही असे वाटते ? लॉक डाऊन काळात तुमच्या शाळेने कोणते नवीन उपक्रम राबवले? ऑनलाइन अध्यापनाचा विद्यार्थ्यांना फायदा झाला का? शासनाच्या कोणत्या उपक्रमांनी ऑनलाईन अध्यापनात मदत झाली ? विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे केले ? कोरोना काळात विद्यार्थ्यांना क्लासमध्ये उपस्थित ठेवण्यासाठी कोणती आव्हाने आली ? ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लास अटेंड केले नाहीत त्यांच्यासाठी काय केले ? या प्रकारचे प्रश्न प्रश्नावलीत विचारण्यात आले आहेत.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे