रस्‍त्‍याच्‍या मधोमध पडलेले साहित्‍य पाहून पसरली दहशत...काय आहे संपुर्ण प्रकार

फुंदीलाल माळी
Thursday, 17 September 2020

महामार्ग असल्‍याने कायम रहदारी असते. पण चौफुली असल्‍याने सारे गाडीचा स्‍पीड कमी करूनच जात असतात. पण या चौफुलीवर पडलेल्‍या वस्‍तू पाहून साऱ्यांच्या नजरा तिकडे वळत होत्‍या. हे पाहून सारेजण अवाक होत नव्हते. नवे कपडे, चप्पल, पैंजण आणि सोबत पडलेले साहित्‍य प्रथम दर्शनी पाहिल्‍यानंतर काय असावा हा प्रकार असाच प्रश्‍न साऱ्यांना पडत होता.

तळोदा (नंदुरबार) : नवे काळे कपडे, पायातील पैंजण, ताट, वाटी, ग्लास, कंगवा, आरसा, तेलाची बाटली, दारू, नवे चप्पलसोबत लिंबू ही कोणत्या पूजा सामग्रीची यादी नसून तळोदा शहराबाहेरील बऱ्हाणपूर– अंकलेश्वर मार्गावरील चिनोदा चौफुलीवरील भररस्त्यात ठेवण्यात आलेली सामग्री आहे. या सामग्रीचा वापर करून सर्वपित्री अमावस्याच्या पार्श्वभूमीवर पुजापाठ केल्याचे सकाळी व्यायामासाठी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना दिसून आले. 

मांत्रिकाची करामत
शहराबाहेरील चिनोदा चौफुलीवर सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना काही साहित्य रस्त्याचा मधोमध ठेवलेले आढळून आले. त्याकडे सर्वचजण कुतूहल व दहशतीने पाहत होते. मात्र हे येथे कोणी आणून टाकले असावे; यावर खलबते सुरू झाली होती. त्यात विविध प्रकारची चर्चा ऐकायला मिळाली. त्यात काहींचे म्हणणे होते की काल सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दिवंगत सर्व पितरांना शांत करण्यासाठी नैवेद्य देऊन पूजा करून त्यांचे स्मरण केले जाते. घरात गोडधोड स्वयंपाक करून घरातच पूजा विधीचा कार्यक्रम करण्यात येतो. मात्र अनेकदा घरातील आजारपण, रोगराई, ताणतणाव, वाद, भांडणे, व्यवसायातील तोटा, कोर्टकचेऱ्या मामले या गोष्टींचा संबंध मांत्रिक लोक जुन्या दिवंगत पितरांशी जोडतात आणि त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्याकडून मंत्रून आणलेल्या विविध वस्तू चौफुली अथवा रस्त्यालगत ठेवतात. मात्र या वस्तू अनेकदा समाजात भीती व दहशत निर्माण करतात.

तर भीतीने येतो आजार
चुकून अशा वस्तूंना कोणाचा पाय लागला; तर भीतीने तो आजारी पडतो आणि त्याला कारण मात्र मांत्रिक शक्ती धरले जाते. अशा वस्तू अनेकदा तेथेच पडून राहतात. गुरेढोरे त्या खातात किंवा वादळ वाऱ्यात त्या उडून जातात. मात्र या सर्व वस्तू अंकलेश्वर- बऱ्हाणपूर मार्गावरील अत्यंत वर्दळ असलेल्या चिनोद चौफुलीवर रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहनधारक त्याच्यापासून लांब राहून आपले वाहन त्या वस्तूंवरून चालणार नाही याची काळजी घेत असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे या सामग्रीला पाहून पायी चालणारे नागरिक देखील त्यापासून दोन हात लांबच चालताना दिसून येत होते. त्यामुळे अजूनही समाजात मोठ्या प्रमाणावर अशा वस्तूंना पाहून दहशतीचे व भीतीचे वातावरण असते हेच दिसून आले आहे.

आजच्या आधुनिक युगातही मंत्रतंत्र, गंडेदोरे अशा क्रियांवर समाज विश्वास ठेवतो आणि आपल्या जीवनातील प्रश्नांना स्वतःच्या बुद्धीच्या सामर्थ्याने लढण्याऐवजी मांत्रिकगिरीच्या आधार घेतो हे चिंताजनक आहे. मानवाच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या क्रियांना यातुक्रिया असे म्हटले गेले आहे. निसर्गात घडणाऱ्या घटनांचा कार्यकारणभाव जेव्हा माणसाला ठाऊक नव्हता, तेव्हा त्याने या क्रियांचा आधार घेतला. पण आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. तेव्हा अशा कोणत्याही यातूक्रियांची गरज मानवी जीवनात असू नये. त्यातून स्वतःचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण होऊ शकते. म्हणून स्वतः विचार करून याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.

विनायक सावळे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda ankleswar barhanpur highway new dress and other literature