esakal | तळोदा येथील महामार्गाचे कार्यालय नंदुरबारला न्यावे; खासदार गावीतांकडे केली मागणी  
sakal

बोलून बातमी शोधा

तळोदा येथील महामार्गाचे कार्यालय नंदुरबारला न्यावे; खासदार गावीतांकडे केली मागणी  

अवजड वाहनांची व प्रवासी वाहनाची नेहमीच या मार्गांवर वर्दळ असते. त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्षानुवर्षे या रस्त्यांची दुरावस्था सुधारत नसल्याचा अनुभव आहे.

तळोदा येथील महामार्गाचे कार्यालय नंदुरबारला न्यावे; खासदार गावीतांकडे केली मागणी  

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा : तळोदा तालुक्यातून जाणारे नेत्रंग शेवाळी महामार्ग व बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या मार्गाची आहे. त्यामुळे वाहनधारकांना रोज जीव मुठीत धरून आपली वाहने चालवावी लागत आहेत. दुसरीकडे या मार्गांशी संबधीत कार्यालये नंदुरबार जिल्ह्यात नाहीत. शेवाळी नेत्रंग या महामार्गासाठीचे कार्यालयही साक्री येथे आहे. त्यामुळे ते कार्यालय नंदुरबार येथे जिल्हयाचा ठिकाणी आणण्याची मागणी भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी खासदार हिना गावित यांच्याकडे केली आहे.

तळोदा अक्कलकुवा तालुक्यातुन जाणारे व महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारे शेवाळी नेत्रंग महामार्ग व बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गांची दुरावस्था वर्षानुवर्षे चर्चेचा विषय आहे. हे दोन्ही महामार्ग मुंबई आग्रा व मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यासाठी जवळचे व सोयीचे आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची व प्रवासी वाहनाची नेहमीच या मार्गांवर वर्दळ असते. त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्षानुवर्षे या रस्त्यांची दुरावस्था सुधारत नसल्याचा अनुभव आहे. या विभागांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करतात.


त्यात लोकप्रतिनिधींनी या मार्गांच्या अनेक वेळा श्रेय घेण्यासाठी म्हणा अथवा चर्चेत राहण्यासाठी हे महामार्ग मंजूर करून आणल्याचे निवडणूक प्रचारात सांगितले आहे. मात्र तरीदेखील या रस्त्यांची दुरावस्था कमी होत नाही. त्यात शेवाळी नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय सध्या साक्री येथे सुरू आहे. या महामार्गावर उद्भवणाऱ्या विविध अडचणी संदर्भात तेथील कार्यालयाशी संपर्क साधण्यात अडचणी येतात. त्यामुळे हे कार्यालय नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करण्यात यावे. जेणेकरून महामार्गावरील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यालयाशी संपर्क करणे सोपे होईल. त्यामुळे हे कार्यालय नंदुरबार येथे सुरू करण्यात यावे अशी मागणी खासदार हिना गावित यांच्याकडे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे. 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे