महामार्ग की शेतरस्‍ता तेच कळेना!

फुंदीलाल माळी
Saturday, 29 August 2020

तळोदा शहरावरून जाणारा बऱ्हाणपूर– अंकलेश्वर महामार्ग गुजरात राज्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मुंबई- आग्रा व मुंबई- अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून या मार्गाकडे पाहिले जाते. त्यामुळे या दोन्ही महामार्गांवर लवकर पोहोचण्यासाठी मोठ-मोठे अवजड वाहने, प्रवासी वाहने या मार्गाचा वापर करतात.

तळोदा : बऱ्हाणपूर– अंकलेश्वर या महत्त्वाच्या मार्गाची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे. महामार्ग की शेतात जाणारा रस्ता अशी चर्चा वाहन धारकांमध्ये होत आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहने चालवताना वाहनधारकांना जिकिरीचे जात आहे. तळोदा– अक्कलकुवा ते खापरपर्यंत एक ते दोन फुटाचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवण्याची अपेक्षा वाहनधारकांना आहे.
तळोदा शहरावरून जाणारा बऱ्हाणपूर– अंकलेश्वर महामार्ग गुजरात राज्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मुंबई- आग्रा व मुंबई- अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून या मार्गाकडे पाहिले जाते. त्यामुळे या दोन्ही महामार्गांवर लवकर पोहोचण्यासाठी मोठ-मोठे अवजड वाहने, प्रवासी वाहने या मार्गाचा वापर करतात. असे असले तरी या मार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या खड्ड्यांनी मार्गावर येणाऱ्या वाहनांचे स्वागत होते. त्यामुळे दरवर्षी तळोदा अक्कलकुवा खापर शहादा या परिसरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो.

आंदोलन होवूनही दुर्लक्ष
खड्ड्यांमुळे अनेकदा वृक्षारोपण करणे, रास्ता रोको सारखी आंदोलने झाली आहेत. मात्र कोणतीही कार्यवाही या मार्गावर होताना दिसत नाही. दगड, मुरुम, खडी टाकून रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र एका महिन्यात त्यांची दुरावस्था होते. दररोज वाहनधारक जीव मुठीत घालून रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या संपूर्ण महामार्गाचे चौपदरीकरण करून महामार्ग व्यवस्थित व्हावा अशी अपेक्षा आहे.

अनेक मार्गाचा प्रश्‍न रखडले
तळोदा शहरावरून नेत्रंग ते शेवाळी हा महामार्ग मंजूर झाला आहे. मात्र कोणताही परिणाम या रस्त्यावर झालेला दिसून येत नाही. केवळ कागदोपत्री चर्चा करून श्रेय घेण्यात येते. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही. दुसरीकडे तळोदा ते प्रकाशा या रस्त्याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रकाशापासून पुढे खेतिया नंदुरबार विसरवाडी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे तळोदा प्रकाशा रस्त्याला सुधारणा करण्यासाठी कोणाकडे मागणी करावी असा प्रश्न वाहन धारकांना पडला आहे. त्यामुळे तळोदा तालुक्याला वाहतुकीने जोडणाऱ्या या मार्गांच्या दुरवस्थेची नेहमी चर्चा होत असते. त्यात तालुक्याला व्यवस्थित रस्ते आजपावेतो तरी स्वप्नच राहिले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda brhanpur ankleshwar highway damage