आगे आगे देखो, होता है क्या; शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण 

फुंदीलाल माळी
Monday, 9 November 2020

तळोदा शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नंदुरबार येथे जाऊन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली. रघुवंशी यांच्या नावाची राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिफारस झाल्याने ही भेट घेण्यात आली.

तळोदा (नंदुरबार) : भाजप व शिवसेनेच्या तळोदा नगरपालिकेतील आजी-माजी नगरसेविकांचे पतिराज शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांसोबत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाल्याने पालिकेतील नवीन राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा शहरात होत आहे. दुसरीकडे शिवसेनेचे शहर प्रमुखांनी सोशल मीडियावर ‘आगे आगे देखो होता है क्या’, असे सूचक वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे. 
तळोदा शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नंदुरबार येथे जाऊन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली. रघुवंशी यांच्या नावाची राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिफारस झाल्याने ही भेट घेण्यात आली. असे असले तरी या भेटीच्या वेळी तळोदा नगरपालिकेतील भाजपच्या विद्यमान नगरसेविका सूनयना उदासी यांचे पती व पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे कार्यकर्ते अनुप उदासी व माजी नगरसेविका कोमल सोनार यांचे पती व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार देखील उपस्थित होते.

सोशल मिडीयावर केले व्हायरल 
या दोघांची उपस्थिती तळोदा नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीची नवी समीकरणे तर नाहीत ना, अशी चर्चा होत आहे. त्यात शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी सोशल मीडियावर आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक वक्तव्य केल्याने पुढील काळात पूर्वाश्रमीचे शिवसेनेत असणारे पदाधिकारी व आता भाजपचे पदाधिकारी असणारे पुन्हा शिवसेनेत जातील की काय, अशी चर्चा शहरात होत आहे. या भेटी प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुलकर्णी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, गौतम जैन, पंचायत समितीचे माजी सभापती आकाश वळवी, माजी जिल्‍हा परिषद सभापती सतीश वळवी, रुपसिंग पाडवी, अनुप उदासी, आनंद सोनार, ज्येष्ठ शिवसैनिक संजय पटेल, पुत्तन दुबे, भूषण सोनार आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda chandrakant raghuvanshi meet and viral social media massage