सातपुड्यातील अस्तंभा शिखरावर कशाचे आहे सवाट; तरी शिखराव रेलिंगच्या कामाला सुरूवात !

फुंदीलाल माळी
Wednesday, 16 September 2020

अस्तंभा शिखरावर यापूर्वीच विजेची व्यवस्था झाली आहे. शिखरापर्यंत खांब टाकून तारा ओढल्या गेल्याने मागील तीन वर्षापासून शिखरापर्यंत वीज पोहोचू शकली आहे.

तळोदा  ः सातपुड्यातील तब्बल १३२५ मीटर उंचीच्या अस्तंभा शिखरावर धोकादायक ठिकाणी रेलिंग टाकण्याचे व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अश्वत्थामा यात्रेनिमित्त दरवर्षी हजारो भाविक अस्तंभा शिखरावर जातात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्यात प्रसिद्ध असणारी ही यात्रा निसर्गसौंदर्याने नटलेल्या सातपुड्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे दरवर्षी यात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे यात्रास्थळे विकास योजनेतून शिखरावर रेलिंग टाकण्याचे काम सुरू आहे. 

सातपुड्यातील अस्तंभा शिखरावर दरवर्षी अस्वस्थामा यात्रा भरते. दिवाळीच्या आनंदपर्वात ही यात्रा तीन ते पाच दिवस सुरू असते. आदिवासी संस्कृतीत या यात्रेला विशेष महत्त्व आहे. खोल दऱ्या, घनदाट जंगल, खडतर चढाव अश्या पायवाटेने दऱ्या-खोऱ्यातून अस्तंभा शिखरावरील ही यात्रा मोठ्या उत्साहात भाविक पार पाडतात. त्यामुळे सुरक्षेचे उपाय देखील त्याठिकाणी करण्यासाठी विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. 

अस्तंभा शिखरावर यापूर्वीच विजेची व्यवस्था झाली आहे. शिखरापर्यंत खांब टाकून तारा ओढल्या गेल्याने मागील तीन वर्षापासून शिखरापर्यंत वीज पोहोचू शकली आहे. त्यासोबतच शिखरावर चढताना साबरबारी भागाच्या पुढे खडतर चढण असल्याने सुरक्षेचे उपाय म्हणून तीन वर्षांपूर्वी रेलिंग टाकण्याचे काम सुरू झाले होते. त्यामुळे भाविकांना तो खडतर चढणाचा भाग पार करणे सोयीचे झाले होते. या वर्षी देखील नोव्हेंबर महिन्यात ही यात्रा भरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच रेलिंग ची दुरुस्ती व नवीन भागामध्ये रेलिंग टाकण्याचे काम सुरू झाले आहे. याकामी अस्तंबा ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच, ग्रामसेवक व गावकरी कामात मदत करीत आहेत. 

कोरोना सावट कायम 
पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या सूचनेवरून यात्रास्थळ विकास योजनेतून ही कामे सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात अस्तंभा शिखरावरील सुरक्षेचे उपाय अजून मोठ्या प्रमाणावर होऊन भाविकांना सोयी सुविधा मिळणार आहेत. यंदा कोरोनाचे सावट असले तरी पुढील एक-दोन महिन्यात परिस्थिती कशी राहते. नंदुरबार जिल्ह्यात त्याचा प्रादुर्भाव किती व कसा राहतो, यावरून अस्तंभा यात्रेला येणाऱ्या हजारो भाविकांच्या नजरा आतापासून त्याकडे लागून आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda Corona's journey begins with the beginning of the railing at the top of the pillar in Satpuda