थरारक...पुलावरून जाताना गेला तोल...मोटारसायकलस्‍वारसह लहान मुलगा जखमी

फुंदीलाल माळी
Monday, 3 August 2020

तळोदा- धवळीविहीर रस्त्यावर हलालपूर गावाच्या पुढे रस्त्यावरील पुल पावसामुळे वाहून गेला आहे. भराव पूर्णपणे वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे. या गावाचा संपर्क तुटला होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्‍याने गावकऱ्यांनी स्वतः ये- जा करण्यापुरता पर्यायी रस्ता तयार केला आहे.

तळोदा (नंदुरबार) : तळोदा येथून किराणा सामान धवळीविहीर गावी घेऊन जाणारा मोटारसायकलस्वार तुटलेल्या पुलावर तोल गेल्याने खाली कोसळल्याची घटना आज घडली. मागे बसलेल्या लहान मुलाला देखील जबर मार लागला आहे. तुटलेला पुल व निकृष्ट कामामुळे वाहून गेलेला भरावामुळेच घटना वारंवार घडत असल्याने धवळीविहीर ग्रामस्थांचे म्‍हणणे आहे. 

तळोदा- धवळीविहीर रस्त्यावर हलालपूर गावाच्या पुढे रस्त्यावरील पुल पावसामुळे वाहून गेला आहे. भराव पूर्णपणे वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे. या गावाचा संपर्क तुटला होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्‍याने गावकऱ्यांनी स्वतः ये- जा करण्यापुरता पर्यायी रस्ता तयार केला आहे. त्या रस्त्यावरून कसरत करत वाहन चालवावे लागते. अशातच सोमवारी रक्षाबंधन असल्याने प्रकाश बारक्‍या पावरा हे आपल्या मोटार सायकलने तळोदा येथून किराणा सामान घेऊन आपल्या लहान मुलासोबत परत येत होते. भराव वाहून गेल्याने रस्ता नसल्यासारखी परिस्थिती असल्याने बाजूला असलेल्या निमुळत्या रस्त्यावरून मोटारसायकल काढताना तोल जाऊन ते पुलाचा खड्ड्यात मोटार सायकलसह खाली पडले. यामुळे त्यांना व लहान मुलाला जबर मार लागला आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी जेमतेम त्यांना तिथून बाहेर काढले. यात मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. 

भराव वाहून दरवर्षी ठरते डोकेदुखी 
पुलाचे निकृष्ट काम व वाहून जाणारा भराव दरवर्षी डोकेदुखी ठरतो आहे. परिसरातील नागरिकांना त्रासाचे ठरत आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना वाहन काढणे अवघड होते. मात्र संबंधित विभाग दर पावसाळ्याच्या आधी वरवर डागडुजी करतात. मात्र पहिल्याच पावसात भराव वाहून जात असल्याने धवळीविहीर गावातील नागरिकांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे . मोटर सायकलस्वार व लहान मुलगा मोटारसायकलसह खाली पडल्याने तेथील परिस्थिती किती बिकट असावी, याची प्रचिती आली आहे. त्यामुळे येथील पुलाचे नवीन बांधकाम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda damage bridge motorbike Collapsed boy and child