
तळोदा : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवून गाव परिसरात असणाऱ्या जैवविविधतेचे रक्षण करून पर्यावरणाचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य चिंचोरा (ता. शहादा) या छोट्याशा पाडे वजा गावात सुरू आहे. यात वृक्ष लागवड करून संवर्धन करणे, चाराबंदी, कुऱ्हाड बंदी करून मातीची होणारी धूप थांबवणे, बांध बंधिस्ती करणे, लहान मोठे दगडी बांध बांधून पाणी जिरविण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक उपक्रमांनी चिंचोरा गावाने पर्यावरण समृद्धीचा विडा उचलला आहे.
सातपुड्याचे पर्यावरण कधीकाळी समृद्ध जैवविविधतेने भरलेले होते. मात्र या समृद्ध वन संपदेला विविध कारणांनी नखे लागली. शासन, प्रशासन व विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने सातपुड्याचे ते समृद्ध पर्यावरण पुनरुज्जीवन करण्याचे कार्य सुरू आहे. असेच कार्य उनपदेवजवळील चिंचोरा या लहानशा पाड्यात सुरू आहे. या गावातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी आपल्या गावाच्या परिसरात असलेली पडीक उघडीबोडकी जमीन पुन्हा हिरवीगार करण्यासाठी कार्य सुरू केले आहे.
चिंचोरा पाड्याच्या परिसरात जैवविविधता क्षेत्र तयार करून झाडे लावण्यात आली आहेत. सुमारे तीन हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन केले जात आहे. तेथील जमिनीची धूप होत असल्याने दगडी बांध बांधणे, मातीचे बांध तयार करणे, गवत वाचविण्यासाठी चराईबंदी, कुऱ्हाड बंदी लागू केली आहे. भूजलाचे पुनर्भरण करण्यासाठी ठिकठिकाणी चाऱ्या खोदण्यात आल्या आहेत. गावातील शेतकऱ्यांना झाडांपासून उत्पन्न मिळावे म्हणून आंबा, महू, आवळा, साग, चारोळी, बांबू अशा ७२ प्रकारच्या देशी झाडांची निगा राखत संवर्धनावर भर दिला आहे.
गावातील तरुण कृष्णा ठाकरे यांनी सांगितले की, गावातील युवक युवतींनी या उपक्रमात प्रशिक्षणार्थी म्हणून केलेल्या भरघोस भागीदारीमुळेच परिसंस्थेचे समृद्धीकरण शक्य होत आहे. त्यात तेथेच एक वनौषधी उद्यान तयार करून वनस्पतीचे जतन केले जात आहे. नवीन पिढीला वनौषधीची माहिती व्हावी म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या सर्व कामासाठी चिंचोरा परिसराला अंबरसिंग महाराज ज्ञान विज्ञान शैक्षणिक प्रसार मंडळ, इकॉलॉजिकल सोसायटी पुणे , महाराष्ट्र ज्ञान महामंडळ फाउंडेशन, एक्वाडॅम, बायफ या संस्थांचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय , वनविभाग यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे.
वनाधिकार कायद्यानुसार गावातील आदिवासी समूहाला १३८ हेक्टरचे सामुहिक वनजमिनीचे क्षेत्र नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मिळाले. गावातील लहान थोर सर्व लोकांच्या सामुहिक सहभागातूनच आम्ही हा उपक्रम राबवित आहोत.
- उत्तम पवार,ज्येष्ठ कार्यकर्ते, चिंचोरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.