शेतकऱ्यावर बिबट्या गुरगुरला, डरकाळीही फोडली; तरी मोबाईलमध्‍ये केला व्हिडीओ

फुंदीलाल माळी
Sunday, 8 November 2020

नांगरटी करत असताना अचानक ट्रॅक्‍टरसमोर बिबट्या येवून उभा राहिला. समोर असलेल्‍या व्यक्‍तीला पाहून बिबट्या गुरगुरला आणि डरकाळीही फोडली. पण शेतकऱ्याने प्रसंगावधान राखले. बिबट्या रस्‍ता वळवत मार्गस्‍थ होत असल्‍याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये करण्याचे धाडस केले.

तळोदा (नंदुरबार) : शेतात नांगरटी करणाऱ्या शेतकऱ्यावर गुरगुरणाऱ्या व डरकाळी देणाऱ्या बिबट्याने परिसरात दहशत निर्माण केली. वेळीच प्रसंगावधान राखून व बिबट्याची डरकाळी ऐकून शेतकऱ्याने ट्रॅक्‍टर मागे घेतले. त्यामुळे बिबट्या उसाच्या शेतात गेला व शेतकऱ्याच्या जीव वाचल्याची घटना तळोद्यातील हातेडा रस्त्यावरील आग्यावड शिवारात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
ट्रॅक्टर चालक भरत कर्णकार हे हातोडा रस्त्यावरील आग्यावड शिवारात मनोज गंगाराम सूर्यवंशी यांच्या शेतात नांगरटी करत होते. त्याच वेळी शेतात बसून असलेल्या बिबट्याने त्यांच्याकडे पाहून गुरगुरायला सुरुवात केली. वाघाच्या गुरगुरणे व डरकाळ्या ऐकून ट्रॅक्टर चालक भरत कर्णकार यांनी प्रसंगावधान राखून ट्रॅक्टर मागे घेतले. ट्रॅक्टर मागे घेतल्याने स्वतःला सुरक्षित समजून बिबट्याने आपला रस्ता धरला. मात्र, त्या पाच मिनिटांचा थरार ट्रॅक्टर चालक भरत कर्णकार यांच्या जीवावर बेतला असता अशी माहिती त्यांनी दिली.

तरीही मोबाईलमध्ये केला व्हिडीओ
ट्रॅक्टरपासून बिबट्या लांब गेल्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्या जातानाचा व्हिडीओ काढला व सोशल मीडियावर अपलोड केला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील काळात उसाची तोडणी हंगाम सुरू होणार आहे. अशा वेळी दिवसाढवळ्या दिसणाऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना दहशतमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान झालेल्या प्रकाराची शहरात एकच चर्चा होत आहे.

कार्यवाही अडकू नये
तालुक्यातील मोहिदा येथील तरुण शेतकरी शरद खंडू चव्हाण यांचा मृत्यू वन्य प्राण्याचा हल्ल्यात झाला होता. त्यावेळी तो हल्ला बिबट्या की अस्वलाने केला; या चौकशीत अडकून राहिलेल्या वनविभागाने तालुक्यात कोणतीही कार्यवाही केली नाही. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पुन्हा अशा घटना घडू नये; म्हणून ठोस पावले उचलण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda farm bibtya come tractor and farmer take video mobile