पावसाच्या सततधारेने हिरवे स्वप्नं भंगले, आणि कापूस उपटून फेकावा लागला  

सम्राट महाजन 
Tuesday, 8 September 2020

पावसाचा फटका खरीप हंगामातील कापसाला चांगलाच बसला असून यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तळोदा ः कापसाची वाढ झाली खरे पण संततधार पावसामुळे कापसाला बोंडेच न आल्याने तळोदा तालुक्यातील पाडळपुर येथील शेतकऱ्यांवर सुमारे सहा एकर क्षेत्रावरील कापूस उपटून फेकण्याची वेळ ओढवली आहे. यामुळे हिरवे स्वप्नं पूर्ण होत भरघोस उत्पादन मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले गेले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करीत त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तळोदा तालुक्यात अपवाद वगळता जवळपास सर्वच गावांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची संततधार सुरु होती. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळपूर, जांभई, गोपाळपूर पुनर्वसन आदी परिसरात देखील गेल्या महिनाभरात जोरदार पाऊस पडला आहे. मात्र या पावसाचा फटका खरीप हंगामातील कापसाला चांगलाच बसला असून यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाडळपूर परिसरातील शेतकऱ्यांनी या खरीप हंगामात हमखास व भरवशाचे उत्पन्न देणारे पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.

 

कापूस भरघोस येण्याची होती आशा

सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने लागवड केलेल्या कापसाची जोमाने वाढ देखील झाली होती. त्यामुळे यावर्षी कापसाचे भरघोस उत्पादन येईल अशी स्वप्ने बळीराजा रंगवत असतानाच ऑगस्ट महिन्यातील संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अक्षरशः पाणी फेरले आहे. कापसाची पुरेपूर वाढ होऊन देखील कापसाला बोंड येण्याची कोणतीच चिन्हे दिसून येत नसल्याने पाडळपूर येथील शेतकऱ्यांनी अखेर आपल्या शेतातील 6 एकरावरील कापूस उपटून फेकला आहे. त्यामुळे कापूस लागवडीचा खर्च वाया गेलाच आहे उलट कापूस शेतातून उपटून काढण्यासाठी मजुरीचा खर्च देखील शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर बसला आहे. सदर नुकसानीचा कृषी विभागामार्फत पंचनामा करण्यात यावा व तात्काळ नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी पाडळपूर परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे....

संततधार पावसाने संधी हिरावली 
जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सुरुवातीच्या काळात जोमाने पीक वाढली होती, यामुळे यावर्षी आपले हिरवे स्वप्नं पूर्ण होईल अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने संततधार लावून धरली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर खतांची मात्रा, औषध देणे, कोळपणी करणे आदी गोष्टी जमल्या नाहीत. तसेच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश देखील मिळाला नाही. त्यामुळे पावसाचा संततधारेने अनेक शेतकऱ्यांची संधी हिरावली असेच म्हणावे लागेल.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda incessant rains, cotton plant did not get a bond and farmers take out cotton.