esakal | अरे बापरे , शहराच्‍या वेशीवरच बिबट्याची दस्तक 
sakal

बोलून बातमी शोधा

अरे बापरे , शहराच्‍या वेशीवरच बिबट्याची दस्तक 

बिबट कुत्र्याला तोंडात उचलून घेऊन जात असल्याचे व त्या बिबटला भुंकत इतर कुत्रे घाबरून तेथून पळ काढत असल्याची दृश्ये कैद झाली आहेत. 

अरे बापरे , शहराच्‍या वेशीवरच बिबट्याची दस्तक 

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा ः येथील अमरधामजवळ असणाऱ्या जे. के. मोटर्स गॅरेजजवळ रात्री बाराच्या सुमारास एक बिबट्या कुत्र्याला तोंडात उचलून घेऊन जात असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एक बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले होते. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सीसीटीव्हीतील दृश्ये पाहता आता शहरातील नवीन वसाहतींमध्ये कधीही बिबट्या शिरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


तळोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बऱ्याचदा बिबटचे पायाचे ठसे किंवा बिबटचे बछडे आढळून आली आहेत, तसेच शहराला लागून असलेल्या परिसरातील अनेक शेतांमध्ये सुध्दा रात्री- अपरात्री बिबटने अनेकदा शेतकऱ्यांना अथवा मजुरांना दर्शन दिले आहे. मात्र आता तर बिबटने चक्क तळोदा शहराचा वेशीवरच दस्तक दिली आहे. तळोदा- शहादा रस्त्यावर असलेल्या अमरधामजवळ जे. के. मोटर्स गॅरेज असून या गॅरेजमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री बिबट कुत्र्याला तोंडात उचलून घेऊन जात असल्याचे व त्या बिबटला भुंकत इतर कुत्रे घाबरून तेथून पळ काढत असल्याची दृश्ये कैद झाली आहेत. 

नागरिकांसाठी धोक्‍याची घंटा 
गॅरेजपासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या नगरसेवक गौरव वाणी यांच्‍या शेतात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी ट्रॅप कॅमेरा व बिबटला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र बिबट पिंजऱ्यात आलाच नव्हता, परंतु ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद झाला होता. त्याचप्रमाणे या गॅरेजला लागून असलेल्या बहुरूपा रस्त्यावरील शेतांमध्ये देखील अधूनमधून बिबट शेतकऱ्यांना व मजुरांना दिसून आला. बिबटने या परिसरातील शेतांमध्ये कुत्रे, डुकरे, शेळ्या, पारडू यांना आपले लक्ष केले आहे. आता बिबट शहराच्‍या हद्दीत येऊन ठेपला असून ही बाब निश्चितच नवीन वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image
go to top