esakal | बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचा स्तुत्य उपक्रम; वाचनालास दिले पुस्तक भेट 

बोलून बातमी शोधा

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचा स्तुत्य उपक्रम; वाचनालास दिले पुस्तक भेट }

जमा झालेल्या निधीतून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक व इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद केली

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचा स्तुत्य उपक्रम; वाचनालास दिले पुस्तक भेट 
sakal_logo
By
फुंदिलाल माळी

तळोदा : लग्न म्हटलं की मानपान, आहेर या गोष्टी आल्यातच! खरंतर बोहल्यावर चढणाऱ्या नव वधू-वरांना आशीर्वाद, शुभेच्छांसह आहेर स्वरूपात भेटवस्तू किंवा पैसे देण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. परंतु चक्क नवरदेवानेच आपल्या लग्नाची आठवण म्हणून विवाहप्रसंगी राजविहीरच्या वाचनालयाला पुस्तकांची भेट दिली आहे. त्यांच्या या अनोख्या भेटीची सध्या सोशल मीडियासह जनसामान्यांमध्ये विशेष चर्चा होत आहे


शहादा येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या वीरेंद्र तुकाराम पाडवी यांचा विवाह राजविहीर (ता. तळोदा) या आपल्या मूळ गावी नुकताच झाला. त्या वेळी नवरदेव वीरेंद्र पाडवी यांनी विवाहाचे औचित्य साधत गावातील वाचनालयाला आपल्या विवाहाची आठवण म्हणून भेट स्वरूपात स्पर्धा परीक्षांची पुस्तके देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. या स्पर्धा पुस्तकांची गावातील होतकरू, अभ्यासू विद्यार्थ्यांना फार मोठी मदत होणार असून, भविष्यात आपले करिअर घडविण्यासाठीही त्याचा फायदा होणार आहे. सोबतच त्यांनी ‘शिक्षणाची बचतपेटी’ या उपक्रमालादेखील एक हजार १११ रुपयांची देणगी दिली. या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक व इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद केली जाते. एवढेच काय तर नवदांपत्यांच्या, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात ५० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्पही हाती घेतला. वीरेंद्र पाडवी यांच्या या आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याचे कौतुक करण्यात येत आहे. 

अनावश्यक खर्च टाळून लग्नानिमित काही तरी विधायक परंपरा सुरू करावी, या हेतूने हा उपक्रम मी राबविला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही होणाऱ्या विवाह सोहळ्याप्रसंगी नववर व वधूकडून हा उपक्रम राबवला जावा, ही अपेक्षा आहे. जेणेकरून प्रत्येक वर-वधूला आपण समाजातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी सत्कार्य केले याचा सार्थ अभिमान वाटेल. 
-वीरेंद्र पाडवी, राजविहीर 

 

संपादन- भूषण श्रीखंडे