
क्रीडा संकुल चालविण्याच्या अटी व निकष फार किचकट असून क्रीडा संकुल चालवणे खर्चीक आहे. त्यामुळे कुठलीही संस्था तीन वर्षात पुढे आली नसल्याचे सांगितले जाते.
तळोदा ः शहरातील सुमारे एक कोटी रुपये खर्चून तालुका क्रीडा संकुल तीन वर्षांपासून कोणताही वापर होत नसल्याने धूळखात पडले आहे. त्यामुळे शासनाच्या सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च वाया जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. क्रीडा संकुल चालविण्यासाठी कोणत्याही संस्थेने अथवा क्रीडा मंडळांनी पुढाकार न घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगितले जाते. ज्या उद्देशाने क्रीडा संकुल तयार करण्यात आले होते तो उद्देश तळोद्यात सफल झाला नाही असेच खेदाने म्हणण्याची वेळ क्रीडाप्रेमींवर आली आहे.
तळोदा शहरातील व तालुक्यातील खेळाडूंच्या विकास व्हावा व अनेक खेळ एकाच छताखाली तसेच परिसरात खेळता यावे आणि खेळाडूंना मार्गदर्शन मिळून विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवावे या हेतूने शहरातील आयटीआय कॉलेजच्या मागे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले. या क्रीडा संकुलासाठी तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांनी प्रयत्न करून पुढाकार घेतला होता. १० जून २०१७ ला तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या हस्ते लोकार्पण झाले. मात्र लोकार्पण होऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला परंतु या क्रीडासंकुलाचा कोणताही वापर होत नाही. संकुलाचा आतील भागात पक्षांनी आपले घरटी बनवलेली आहेत. काचेची तावदाने फुटून काचा इतरत्र पडलेल्या आहेत. संपूर्ण परिसराची दुरवस्था झाली आहे. पाण्यासाठी केलेल्या पाइपलाइन ठिकठिकाणी तुटल्या आहेत तर वापराविना संकुल परिसर अतिशय भकास झाला आहे.
किचकट अटी, शर्ती
क्रीडा संकुल चालविण्याच्या अटी व निकष फार किचकट असून क्रीडा संकुल चालवणे खर्चीक आहे. त्यामुळे कुठलीही संस्था तीन वर्षात पुढे आली नसल्याचे सांगितले जाते. त्यात तळोदा हा आदिवासीबहुल तालुका आहे. पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी या क्रीडा संकुलाला भेट दिली होती. तेव्हा संकुल हस्तांतरण करण्याचा तांत्रिक बाबी अधिकाऱ्यांशी चर्चा करून जाणून घेतल्या होत्या. मात्र हा प्रश्न अजूनही मार्गी लागू शकलेला नाही. त्यामुळे क्रीडा संकुल चालविण्यासाठीच्या अटी व शर्ती बाबतीत सूट मिळावी व खेळाडूंसाठी क्रीडा संकुल सुरू होण्याची क्रीडाप्रेमींना आजही प्रतीक्षाच लागून आहे.
संकुल सुरू होण्यासाठी प्रतीक्षा
संकुल चालविण्यासाठी सुलभ व लवचीक नियमावली राहिली असती तर एखाद्या तरी संस्थेने संकुल चालविण्यासाठी पुढाकार घेतला असता, मात्र ना कोणत्या संस्थेने ते चालविण्यासाठी घेतले ना तेथील परिसराचा विकास झाला. त्यामुळे संकुलासारखी मोठ्या इमारती तयार करताना त्या वापरात राहतील व जेणेकरून निधीचा सदुपयोग होईल हे देखील पाहणे महत्त्वाचे असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे