कोरोना काळात रेशनने गरीब, गरजूंची भागवली भूक ! 

फुंदीलाल माळी 
Friday, 16 October 2020

अन्नाची गरज भागविताना जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. पोटाची खळगी भरणाऱ्या दाही दिशा फिरणाऱ्या मानवासाठी सर्वांच्याच सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

तळोदा ः नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल १४ लाखांहून अधिक लोकसंख्या अन्नाची गरज भागविण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रेशनिंग व्यवस्थेवर अवलंबून आहे. कोरोना काळात रेशनिंग व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखितच झाले. त्यामुळे नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळाले. 

वाचा- भूजलपातळी वाढीत शिंदखेडा तालुक्याची सरशी!

लॉकडाउन काळात अनेकांचा रोजगार बुडाला. कामधंदे बंद झाले. व्यवसाय ठप्प झाले. स्थलांतर करून नागरिकांना यावे लागले. आर्थिक घडी विस्कटल्यामुळे देवाणघेवाण पूर्णपणे ठप्प झाली होती. अशा कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू व तांदळाने नागरिकांना दिलासा दिला. एवढेच नव्हे, तर विनाशिधापत्रिकाधारक कुटुंबांना अन्न पुरविले गेले. एकट्या तळोदा तालुक्यात १६१ विनाशिधापत्रिकाधारक कुटुंबे होती. त्यातील ६६८ लोकसंख्येला दोन महिन्यांसाठी ६६ क्विंटल तांदूळ पुरविण्यात आला. 
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना काळात प्रत्येकी पाच किलो तांदूळ तीन महिन्यांसाठी मोफत देण्यात आला. जिल्ह्यातील केशरी कार्डधारक ५५ हजार ९३५ असून, त्यावर दोन लाख चार हजार ९०४ इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे रेशनवर धान्य घेणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. 

वितरण प्रणाली मजबुतीची गरज 
नंदुरबार जिल्हा देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. त्यामुळे देशाचे लक्ष जिल्ह्यावर असते. मानव विकास मिशनमध्येही जिल्हा पिछाडीवर आहे. त्यात निरंतर मोठ्या प्रमाणावर कामे होऊन जिल्हा प्रगतिपथावर येत आहे. त्यामुळे अन्नाची गरज भागविताना जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. पोटाची खळगी भरणाऱ्या दाही दिशा फिरणाऱ्या मानवासाठी सर्वांच्याच सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. 

नंदुरबार जिल्‍ह्यातील रेशनकार्डे, लोकसंख्या 
अंत्योदय योजना ः १,०५,४५० - ५,५६,०३३ 
प्राधान्य कुटुंब योजना ः १,७०,९२४ - ७,३१,६६६ 
केशरी कार्डधारक ः ५५,९३५ - २,०४,९०४ 
एकूण ः ३,३२,३०९ - १४,९२,६०३ 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda ration satisfies the hunger of the poor and needy during the corona period