esakal | नोव्हेंबरमध्येच रोझवा प्रकल्‍पातील पाण्याची पातळी निम्‍म्‍यावर
sakal

बोलून बातमी शोधा

taloda rojhava praklp

तळोदा तालुक्यात कोठार जवळील रोझवा प्रकल्प महत्त्वाचा प्रकल्प आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे नैसर्गिक उतार असल्याने या पाणीसाठ्याची भूजल पातळी वाढण्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे.

नोव्हेंबरमध्येच रोझवा प्रकल्‍पातील पाण्याची पातळी निम्‍म्‍यावर

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा (नंदुरबार) : अहोरात्र वाहणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे तालुक्यातील रोझवा लघू प्रकल्पातील पाण्याचा साठा नोव्हेंबर महिन्याच्या मध्यातच निम्म्यावर आला आहे. यामुळे यावर्षीही रोझवा प्रकल्पातील पाणीसाठा लवकरच संपून उन्हाळा लागण्याआधीच प्रकल्प कोरडाठाक पडण्याची शक्यता आहे. गळतीची दुरुस्तीच होत नसल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र पाटबंधारे विभागाचे दुरुस्तीसाठी केवळ कागदी घोडे रंगवण्यातच भागत असल्याचे चित्र आहे.
तळोदा तालुक्यात कोठार जवळील रोझवा प्रकल्प महत्त्वाचा प्रकल्प आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे नैसर्गिक उतार असल्याने या पाणीसाठ्याची भूजल पातळी वाढण्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे. या पाणीसाठ्यामुळे भूजल पातळी वाढत असल्याने परिसरातील बागायती जमीन ओलिताखाली येते. मात्र या प्रकल्पाच्या भिंतीला तडे पडून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. प्रकल्पाच्या जॅकवेल देखील नादुरुस्त असल्याने त्यातूनही पाणी वाया जाते. मात्र वर्षानुवर्षे दुरुस्तीच होत नसल्याची परिस्थिती आहे.

महिनाभरातच पातळी निम्‍मे
यंदा पावसाने सरासरी ओलांडून चांगली हजेरी लावल्याने प्रकल्प ओसंडून वाहत होता. सप्टेंबर महिन्यात ओसंडून वाहणाऱ्या प्रकल्पामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण होते. मात्र, पावसाळा संपून दीड महिना होत नाही; तोवर प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे. सततच्या गळतीमुळे हा पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे उन्हाळा लागण्याआधीच प्रकल्पातील पाणीसाठा कोरडाठाक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांना पाणी कुठून
भूजल पातळी वाढण्यासाठी सर्वत्र प्रयत्न होत असताना पाटबंधारे विभागाचे या प्रकल्पाकडे होणारे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या बागायती शेती करण्याच्या स्वप्नांवर आघात असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे रोझवा प्रकल्पाच्या नादुरुस्त असलेला जॅकवेल दुरुस्त व्हावा व प्रकल्पाचा भिंतीला गेलेले तडे बुजविण्यात येऊन प्रकल्पाची दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गळती थांबणार कधी?
पाटबंधारे विभागाने प्रकल्पाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठवला असतानादेखील काम सुरू होत नाही. कोकणातील तीवरे धरण फुटल्यानंतर सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र त्या सर्वेक्षणाच्या देखील काहीही उपयोग झाला नसल्याची परिस्थिती आहे. प्रकल्‍पाला तडे पडल्‍याने पाणी गळती कायम सुरू असते. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image