'शाळा बंद पण शिक्षण सुरु' उपक्रमाची तपासणी   

सम्राट महाजन
Thursday, 1 October 2020

जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन शिक्षण दिले जात नसल्याचे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत.

तळोदा: जिल्ह्यातील शाळांमधील कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणाची परिस्थिती नेमकी काय आहे, किती विद्यार्थ्यांपर्यंत 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' हा उपक्रम पोहोचवण्यात आला आहे याची सद्यस्थिती जाणून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचा विकास गटातील केंद्र प्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांचे भरारी पथक तयार करुन, शाळांना भेटी देवून त्यांची तपासणी करीत त्याबाबतचा अहवाल सादर करावा लागणार आहे. 

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. कोरोनाचा काळात विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची, गोडी टिकून राहावी यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात ही अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. शैक्षणिक धोरणानुसार राज्याप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यात देखील 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमानुसार राज्यातील बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यात काही शाळा गुगल लिंक द्वारे, झूम अँपने तर काही शाळा इतर पध्दतीच्या वापर करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत.

 

ऑनलाईन शिक्षण जात नसल्याच्या तक्रारी

मात्र राज्यातील इतर जिल्ह्यांचा तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण, डोंगराळ दुर्गम भाग असल्यामुळे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन शिक्षण दिले जात नसल्याचे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) तसेच कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांची विभागणी करीत किमान 10 शाळांमध्ये कोरोना काळात शिक्षण विभागाने निर्देशित केलेले उपक्रम राबविण्यात येत आहेत का? याची तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda Schools will be inspected and complaints are being made that online education is not being provided