सातपुड्याचे सौंदर्य न्‍याहळण्यासाठी बाराही महिने खुणावते; विकासाबाबत मात्र अनास्‍था

सम्राट महाजन
Sunday, 27 September 2020

सातपुड्याला नैसर्गिक सौंदर्याचे कोंदण असून डोंगरदऱ्यात नागरिकांना आकर्षित करणारी असंख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. ती बाराही महिने नागरिकांचे मन मोहून घेतात. ही स्थळे राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे महाबळेश्वर, आंबोली यांची आठवण करुन देणारी आहेत.

तळोदा (नंदुरबार) : सातपुड्यात डोळ्यांची पारणे फेडणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून त्यांचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बाराही महिने खानदेशातीलच नव्हे, तर शेजारील गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील हौशी पर्यटक, पर्यावरणप्रेमी हजारोच्या संख्येने भेट देत असतात. मात्र शासन, प्रशासन व विशेषतः जिल्ह्यातील आजी- माजी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही स्थळे पर्यटनस्थळांपासून वंचित आहे. आज फक्त ‘सेल्फी पॉईंट’ (Selfie Point) म्हणून या स्‍थळांकडे पाहिले जाते. या स्थळांचा विकास केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊन स्थलांतर टळू शकेल. यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मनापासून काम केले पाहिजे अशा भावना व्यक्त होत आहेत. 

सातपुड्याला नैसर्गिक सौंदर्याचे कोंदण असून डोंगरदऱ्यात नागरिकांना आकर्षित करणारी असंख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. ती बाराही महिने नागरिकांचे मन मोहून घेतात. ही स्थळे राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे महाबळेश्वर, आंबोली यांची आठवण करुन देणारी आहेत. यात राज्यातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे सीताखाई, यशवंत तलाव यासारखे अनेक मनमोहक पॉइंट असणारे तोरणमाळ तसेच पौराणिक महत्त्व असलेले अश्वस्थामाचे शिखर, वाल्हेरी येथील फेसाळणारे धबधबे, चांदसैली घाटातील आकर्षित करणाऱ्या पर्वतरांगा, डोंगरावर लोळणारे ढग व काळजाचे ठोके चुकविणाऱ्या दऱ्या अशी विविध स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. 

बिलगाव येथील बारामुखी धबधबा असो, की कुंडलेश्वर येथील महादेव मंदिर व गरम पाण्याचे झरे आकर्षित करतात. गेंदा गावाजवळ नैसर्गिकरीत्या तयार झालेली दरी व तेथील सौंदर्य नागरिकांचे मन मोहित करते. चांदसैली घाट रस्त्यावरून गढवली, रोझवा, पाडळपूर प्रकल्पातील चंदेरी दिसणारे पाणी नागरिकांना काही काळ तिथे थांबण्यासाठी परावृत्त करते. त्यामुळे आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी सातपुड्याच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नेहमीच गर्दी होत असते. 
 
तर रोजगार उपलब्ध होईल 
सातपुड्यातील प्रेक्षणीय स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र त्यांना योग्य त्या सोयी- सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कोठार, वाल्हेरी, कुंडलेश्वर तसेच धडगाव तालुक्यातील काही ठिकाणी विश्रामगृह व उपाहारगृह होणे आवश्यक आहे. या स्थळांचा पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश करून त्यांचे मार्केटिंग करणे आवश्यक आहे. त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होत त्यांचेही जीवनमान उंचाविण्यास मदत होऊ शकणार आहे. मात्र त्यासाठी शासन, प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 

आजी- माजी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 
नंदुरबार जिल्ह्याच्‍या विकासात सर्वपक्षीय आजी- माजी लोकप्रतिनिधींच्या वाटा आहे हे कोणीच नाकारणार नाही, मात्र नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सातपुड्यातील या प्रेक्षणीय स्थळांच्या विकासाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले गेले नाही हे देखील सत्य नाकारून चालणार नाही. मागील काळात पालकमंत्री असणारे आमदार जयकुमार रावल यांच्याकडे पर्यटन खाते होते तसेच आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी देखील पर्यटन खाते सांभाळले आहे. त्यावेळी अनेक घोषणा झाल्या होत्या, मात्र या प्रेक्षणीय स्थळांचा विकास व्हायला पाहिजे तसा झालेला नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda tourist day satpuda hills not development