शेतकऱ्यावर हिंसक प्राण्याचा हल्ला... मोहिदा परिसरात दहशतीचे वातावरण !

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

शेतात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता हा हल्ला अस्वलाच्या असावा अशी शक्यता आहे. नागरिकांनी घाबरू नये. सायंकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत घराबाहेर पडू नये. शेतात एकट्याने न जाता सोबतीने जावे. मयताच्या वारसास शासकीय नियमानुसार मदत मिळवून दिली जाईल. 

एस. बी. केवटे, उपवनसंरक्षक, मेवासी विभाग शहादा,  नंदुरबार
 

तळोदा  : मोहिदा (ता. तळोदा) येथील शरद खंडू चव्‍हाण या शेतकऱ्याचा काल वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तो वन्य प्राणी बिबट की अस्वल अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. तालुक्यात बिबट्याचा मुक्तसंचार आढळतो. त्यामुळे दिवसभर बिबट्याचा हल्ला झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र घटनास्थळी मिळालेल्या पाऊलखुणा व मयताच्या अंगावरील जखमा पाहता तो प्राणी अस्वल देखील असू शकतो, अशी शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. मात्र परिसरात तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने मोहिदा परिसरात दहशतीचे वातावरण आहे. 

शेतकरी शरद चव्‍हाण शेतात ट्रॅक्टरवर नांगरटीचे काम करून परतत असताना त्यांच्यावर वन्य प्राण्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावरील जखमा खोल व गंभीर स्वरूपाचा असल्याने परिसरात वन्य प्राण्याबद्दल चर्चा सुरू आहेत. मोहिदा शिवारात बिबट्याच्या देखील वावर आहे. मागील वर्षी उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले होते. त्यामुळे शरद चव्हाण यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाल्याची चर्चा होती. 
मात्र मयत शरद चव्हाण यांच्या अंगावरील गंभीर जखमा पाहता हा हल्ला अस्वलाचा असावा अशीही शक्यता व्यक्त होत आहे. तालुक्यात अस्वलांच्या देखील वावर आढळून येतो. त्यामुळे अस्वलाच्या हल्ल्याचीही चर्चा तालुक्यात सुरू आहे. मात्र वन्य प्राण्यांच्या या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

वनविभागाचा अधिकाऱ्यांची भेट 
दुसरीकडे वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील दहशतीचे वातावरण कमी होण्यासाठी गस्ती पथक तैनात केले जात आहे. परिसरातील गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष पथक ठेवण्यात येणार आहे. ट्रॅप कॅमेरे लावून परिसरात असलेल्या वन्यप्राण्यांच्या छडा लावला जाणार आहे. त्यात परिसरात पिंजरे लावण्याचीही कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे. दरम्यान आमदार राजेश पाडवी , उपवनसंरक्षक एस बी केवटे , वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयताच्या वारसांना शासकीय नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda Violent Wild animal attack farmar deth