#SakalForDEdआता कुणाला शिक्षक व्हायचं नाही? डी.एड.ची राज्यातील स्थिती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नाशिक/खामखेडा : कधी काळी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणारा शिक्षकी पेशा आता युवकांना नकोसा वाटू लागलाय की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये डी.एड. अभ्यासक्रमाच्या उपलब्ध असलेल्या 53 हजार जागांसाठी चौदाच हजार अर्ज प्राप्त झाले असल्याने आता कुणाला शिक्षक व्हायचं नाही का? असा प्रश्‍न उपस्थितीत होतोय. दीर्घ कालावधीपासून शिक्षक भरतीच होत नसल्याने या क्षेत्राकडे युवावर्ग पाठ फिरत असल्याचे चित्र आहे. 

नाशिक/खामखेडा : कधी काळी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणारा शिक्षकी पेशा आता युवकांना नकोसा वाटू लागलाय की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये डी.एड. अभ्यासक्रमाच्या उपलब्ध असलेल्या 53 हजार जागांसाठी चौदाच हजार अर्ज प्राप्त झाले असल्याने आता कुणाला शिक्षक व्हायचं नाही का? असा प्रश्‍न उपस्थितीत होतोय. दीर्घ कालावधीपासून शिक्षक भरतीच होत नसल्याने या क्षेत्राकडे युवावर्ग पाठ फिरत असल्याचे चित्र आहे. 

एकेकाळी अर्ज मिळणेदेखील दिव्य, अर्जासाठी संघर्ष, तो भरून दाखल करण्यासाठी करावी लागणारी कसरत, एवढे करूनही प्रवेश मिळतो की नाही याची धास्ती, अशी अध्यापक शिक्षण पदविका अर्थात डी.एड. अभ्यासक्रमाची स्थिती होती. मात्र गेल्या तीन-चार वर्षांत मात्र शिक्षक घडविणाऱ्या या विद्यालयांच्या वाट्याला वनवास आल्याची स्थिती आहे. राज्यात डी.एड विद्यालयांमधील सुमारे 53 हजार जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी प्राप्त अर्जांची संख्या केवळ चौदा हजार इतकी आहे. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी जरी प्रवेश घेतला तरी डी.एड. अभ्यासक्रमाच्या राज्यभरातील 40 हजार जागा रिक्त रहाण्याची स्थिती आहे. या अभ्यासक्रमाची अशी स्थिती का झाली, याची विचारमिमांसा करण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. 

नाशिक जिल्ह्यात अवघे 341 प्रवेश 
नाशिक विभागातून या वर्षी चार हजार जागांपैकी एक हजारदेखील प्रवेश होतात की नाही याची शंका आहे. जिल्ह्यात 30 महाविद्यालयांमध्ये 1480 जागा उपलब्ध असून पहिल्या फेरी अखेर अवघे 466 प्रवेश निश्‍चित झालेले आहे. यात उर्दु माध्यमाचे 100, मराठी माध्यमाचे 341, इंग्रजी माध्यमाचे 25 अशी स्थिती आहे. 

शिक्षक भरती बंदचा प्रामुख्याने फटका 
अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर नोकऱ्याच उपलब्ध नसल्याने अन्य कुठल्यातरी पर्यायाची निवड करण्यास युवक प्राध्यान्य देता आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गेल्या दहा वर्ष्यात दरवर्षी 80 हजारांच्या सुमारास विद्यार्थी डी.एडची पदविका घेऊन बाहेर पडलेत. पण त्या तुलनेत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. गेल्या सात आठ वर्षात शासनाची भरती नाही. संस्थांमध्ये वशिला व पैसा नसल्याने डिग्री घेऊनही फायदा नसल्याने फक्त लग्न पत्रिकेत डीएड मिरवण्यासाठीच पदवी काय, अशी खिल्ली उडवली जात आहे. शिक्षक भरती बंद असल्याचा या अभ्यासक्रमाला फटका बसला आहे. 

महाविद्यालये बंद करण्याची वेळ 
   नाशिक जिल्ह्यातील 45 महाविद्यालायापैकी 17 महाविद्यालये विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याने माघील दोन वर्षात बंद पडलीत. सध्या जिल्ह्यात 28 महाविद्यालयांपैकी 6 शासकीय महाविद्यालय तर 22 खासगी विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाला मिळालेला अत्याल्प प्रतिसाद पाहता, आणखी महाविद्यालये बंद करण्याची वेळ ओढावू शकते, अशी स्थिती आहे. 

डीएड विद्यालयांच्या वाट्याला वनवास 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत बारावी कला, वाणिज्य,विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा अध्यापक शिक्षण पदविका डीएड अभ्यासक्रम चालविला जातो.अल्प काळातील कोर्स, उत्तम वेतन यामुळे अनेक वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे शहरी-ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news teacher ded