तीन वर्षाच्या चिमुकलीचा काय दोष...त्याची वाईट नजर पडलीच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

आता कुठे चालायला लागली अन्‌ पावले धावू लागले होते. तिला काही समजत नाही. तरीही त्याची वाईट नजर या चिमुकलीवर होती. चॉकलेट देतो म्हणून सांगत; सोळा वर्षीय नराधमाने या तीन वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली

यावल : जगाची पुरेशी कल्पना नसलेल्या व स्वच्छंदी जीवन जगण्याच्या वयातील कोमल कळीला कुसकरण्याचा घृणास्पद प्रकार तालुक्‍यात आज घडला. आता कुठे चालायला लागली अन्‌ पावले धावू लागले होते. तिला काही समजत नाही. तरीही त्याची वाईट नजर या चिमुकलीवर होती. चॉकलेट देतो म्हणून सांगत; सोळा वर्षीय नराधमाने या तीन वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची घटना भालशिव (ता.यावल) येथे आज सकाळी साडेदहा ते अकराचे दरम्यान घडली. 

भालशिव गाव लहान आहे. सगडे बंद असल्याने मुले सकाळी अंगणात, शाळेत खेळण्यास जात असतात. शाळेच्या आवारात खेळणाऱ्या चिमुकलीस उचलून नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रकार घडला. घडलेल्या प्रकार गावात समजल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी संशयित सागर गोपाळ भील यास अटक केली आहे. दरम्यान येथील ग्रामीण रुग्णालयात चिमुकली मुलीवर प्रथमोपचार करून तिला जळगाव येथे आरोग्य तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

ती रडत रडत आली घरी 
यावल तालुक्‍यातील भालशिव येथील तीन वर्षीय चिमुकली आपला मोठा भाऊ व मैत्रिणीसोबत गावातील मराठी शाळेत खेळण्यासाठी सकाळी दहा वाजता गेली होती. एक तासाने म्हणजे अकरा वाजेच्या सुमारास घरी रडत- रडत आली. त्यावेळी तिच्या आईने काय झाले म्हणून तिची विचारणा केली असता तिने आपल्यावरील घडलेला प्रकार आईस सांगितला. 

चॉकलेट देत नेले शाळेच्या मागे 
त्या चिमुकल्या मुलीने सांगितल्याप्रमाणे ती आपल्या मैत्रीण व भावासोबत खेळत असताना गावातीलच तिच्या घरासमोर राहणाऱ्या सागर गोपाळ भील (वय 16) याने तिला चॉकलेट देतो म्हणून सांगत शाळेच्या पाठीमागे घेऊन जात तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केले असल्याचे दिसून आले. दरम्यान त्या मुलीच्या ओरडल्याच्या आवाजाने घाबरून त्या संशयित अल्पवयीन नराधमाने घटनास्थळावरून पळ काढला होता. त्या चिमुकली मुलीची आई व वडिलांच्या प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ यावल पोलीस स्टेशनला येऊन संशयित सागर गोपाळ भील याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. यावल पोलीस स्टेशनमध्ये त्या अल्पवयीन नराधमाविरुद्ध अल्पवयीन मुलीस चॉकलेटचे आमीष दाखवून अनैसर्गिक अत्याचार करून, चापटा मारून, मारहाण करण्याची धमकी दिली म्हणून पिडीत बालिकेच्या आईच्या तक्रारीवरुन बालकांचे लैंगिक गुन्हा दाखल करून संशयितास अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जितेंद्र खैरनार हे करीत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yawal jalgaon three tear girl atyachar