esakal | चाळीसगावातील सहा जण तपासणीसाठी जळगावला आणले

बोलून बातमी शोधा

चाळीसगावातील सहा जण तपासणीसाठी जळगावला आणले

सहा जण ज्या भागात राहतात, त्या संपूर्ण परिसरात पालिकेतर्फे जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना योग्य त्या सूचनाही देण्यात आले.

चाळीसगावातील सहा जण तपासणीसाठी जळगावला आणले
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव ः मालेगाव (जि. नाशिक) येथे आपल्या नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या शहरातील सहा जणांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी जळगाव येथे रवानगी करण्यात आली आहे. खबरदारीचा भाग म्हणून या सहाही जणांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

शहरातील एकाच कुटुंबातील सहा जण मालेगाव येथे काल (८ एप्रिल) नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले होते. ही माहिती मालेगावचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना समजली. श्री. राजपूत हे चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांनी रात्री दोनला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुजित पाटील यांना कळवले. त्यानुसार, श्री. पाटील यांनी पहाटे सहाला चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांच्या घरी जाऊन मालेगावचे तहसीलदार श्री. राजपूत यांच्याशी त्यांचे बोलणे करुन दिले. त्यानुसार श्री. मोरे यांनी सुत्रे हलवून मालेगावला अंत्ययात्रेला जाऊन आलेल्या सहाही जणांना येथील ग्रामीण रुग्णालयात बोलावून पत्र देऊन त्यांना जळगाव येथे प्राथमिक तपासणीसाठी रवाना केले. एकाच कुटुंबातील पाच जण व एक चालक अशा सहा जणांचा यात समावेश आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय गोयर यांनी या सहा जणांची प्राथमिक माहिती घेऊन त्यांना पुढील तपासणीसाठी रवाना केले. दरम्यान, हे सहा जण ज्या भागात राहतात, त्या संपूर्ण परिसरात पालिकेतर्फे जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना योग्य त्या सूचनाही देण्यात आले. हे सहा जण ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले आहेत, त्या त्या ठिकाणी जाऊन फवारणी करण्यात आली. जळगावला या सहाही जणांच्या कोरानाच्या पार्श्वभूमीवर विविध आरोग्य तपासणी येणार असून उद्यापर्यंत (१० एप्रिल) त्यांचा अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी दिली. 

पाच दिवसानंतर घेणार नमुने 
"कोरोना पॉझिटिव्ह' असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले चाळीसगाव येथील सहा जणांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील "कोरोना' विशेष कक्षात दाखल केले होते. "पॉझिटिव्ह' रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे स्वॅप पाच दिवसानंतर तपासणीसाठी पाठविले जात असतात. अद्याप या संशयितांना "कोरोना'ची कुठलीच लक्षणे आढळून आलेली नाही. त्यामुळे या सर्वांना शहरातील शाहू महाराज रुग्णालयात क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. संपर्कात आल्यानंतर पाच दिवसांनी या संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.