बाबांनो गुपगूमान घरी बसा... सक्तीच्या संचारबंदीसाठी पोलिस रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

जिल्ह्यांच्या सीमा पूर्णत: बंद करण्यात येऊन सक्तीची संचारबंदी लागू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलानेही तयारी केली असून, शहरात संचारबंदीचे आदेश सक्तीने पाळण्यात येणार असल्याचे डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले.

जळगाव : संचारबंदी काळात पोलिस ठाणेनिहाय गस्त वाढविण्यात आली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिली. 

जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारपासूनच कलम 144 चे आदेश लागू केले आहेत. सायंकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन महानगरांच्या आणि मोठ्या जिल्ह्यांच्या सीमा पूर्णत: बंद करण्यात येऊन सक्तीची संचारबंदी लागू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलानेही तयारी केली असून, शहरात संचारबंदीचे आदेश सक्तीने पाळण्यात येणार असल्याचे डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले. पोलिस ठाणेनिहाय वायरलेस वाहने आपल्या हद्दीत फिरून बंदचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाईसह गुन्हे दाखल करणार आहेत. फळे, भाजीपाला, वैद्यकीय सेवा, किराणा वगळता सर्वच आस्थापने बंद ठेवण्यात आले आहेत. 

आठ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल 
 गुलाबबाबा कॉलनीत बॉम्बे फुटवेअर, सिंधी कॉलनीतील वालेचा मार्केटमध्ये सलून दुकानदार रामभाऊ झिपरु जगताप (वय 53), काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयासमोरील आइस्क्रीम पार्लर चालक भूषण ज्ञानदेव सरोदे (वय 35), अजिंठा चौकातील युनिक ऑटो इलेक्‍ट्रिक वर्क चालक अबू बकर बशीर खान (वय 45), रामेश्‍वर कॉलनीतील आम्रपाली सलून दुकानचालक राजू रंगनाथ सूर्यवंशी (वय 30), देवेंद्र दिलीप पाटील (वय 22), अशोक किराणासमोरील पानटपरी चालक, संदीप बाबूराव देशमुख (वय 28) हा अंडापाव विक्रेता अशांवर कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathoi news jalgaon Police on the streets for forced communication