आठ गुंठ्यातील झेंडू बनलाय कोर कुटुंबियांचा आधार   

दीपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

कोर दाम्पत्याने जुलै महिन्यात झेंडूची लागवड केली. मात्र पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांनी वडनेर शिवारातुन एका शेतक-याकडून दोनशे ते तीनशे प्रती टॅकर विकतचे पाणी घेऊन अवघ्या तीन महिन्यात झेंडूची शेती फुलविली आहे. बहुतेक वेळा झेंडूच्या फुलांची आवक वाढल्यास झेंडू कवडीमोल विकावे लागते तर काही वेळा तोटाही सहन करावा लागतो. 

नाशिक : अंबासन येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश कोर व सुरेखा कोर या दाम्पत्याने शेती व्यवसायातच वेगळे काही करण्याची जिद्द मनात ठेवून ते शेतीकडे वळले. शेतीमधील वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती घेत असतांनाच अवघ्या आठ गुंठ्यात टॅंकरने विकतचे पाणी घेऊन झेंडूंच्या फुलांची शेती केली आहे. ग्राहक थेट शेतात जाऊन ताजे झेंडूची फुले खरेदी करीत असून हीच शेती कोर कुटुंबियांचा मोठा आधार बनली आहे.  

आवक वाढल्यास झेंडू कवडीमोल विकावे लागते तर तोटाही सहन करावा लागतो

जेमतेम दोन एकर वडिलोपार्जित शेती असलेल्या प्रकाश कोर यांना शेतीवरच उदरनिर्वाह करावा लागत आहे. नामपुर मालेगाव रस्त्यावरील कोठरे फाट्यानजीक असलेल्या शेतीत कोर दाम्पत्याने पंचवीस गुंठ्यात पोल्ट्री फार्म उभारला आहे. तर उर्वरित जागेवर राहण्यासाठी पत्र्याचे घर आणि पारंपारिक पद्धतीने पिके घेतली जात असल्याचे शेतकरी कोर यांनी सांगितले. घराशेजारी आठ गुंठा जागेवर दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या झेंडूची लागवड करीत असतात. बहूतेक वेळा झेंडूच्या फुलांची आवक वाढल्यास झेंडू कवडीमोल विकावे लागते तर काही वेळा तोटाही सहन करावा लागतोय. यंदा पाणीटंचाईमुळे झेंडूची लागवड कसमादे पट्ट्यात कमी झाल्याचे चित्र आहे. कोर दाम्पत्याने जुलै महिन्यात झेंडूची लागवड केली. मात्र पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांनी वडनेर शिवारातुन एका शेतक-याकडून दोनशे ते तीनशे प्रती टॅकर विकतचे पाणी घेऊन अवघ्या तीन महिन्यात झेंडूची शेती फुलविली आहे. 

ग्राहक थेट शेतात जाऊन ताजी फुले खरेदी करतात
कोठरे शिवारात बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथे बोअरवेलला पाणी लागेल याचीही श्वाश्वती नसल्याचे बोलले जाते. अशाही बिकट परिस्थितीत कोर दाम्पत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत देखण्या झेंडूच्या फुलांची शेती बहरली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर फुलशेती असल्याने ग्राहकांना जागेवरच शंभर ते ऐंशी रूपये प्रतिकिलो झेंडूची फुलं उपलब्ध होत असल्याने कोर कुटुंबियांना फुले बाजारात घेऊन जाण्याची गरज पडत नाही. ही झेंडूची फुले दिपावलीपर्यंत चालणार असल्याचे शेतकरी दाम्पत्याने सांगितले. नवनवीन प्रयोगांची आवड असल्यास योग्य नियोजन व मेहनतीच्या बळावर तसेच बाजारपेठेचा अभ्यास करून शेती केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते हे झेंडू फुलांच्यया शेतातुन कोर दाम्पत्याने सिध्द करून दाखवले.

प्रतिक्रिया 

आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या झेंडूची लागवड करतो. बहुतेक वेळा फुलांतुन उत्पन्न खर्च देखील निघत नाही. यंदा मात्र झेंडूच्या फुलांची मागणीही जास्त आणि भाव सुध्दा सुधारीत आहेत. ग्राहक किंवा वाहनचालक रस्त्यावर जातांना शेतात येऊन झेंडूची फुले घेऊन जात आहेत. - प्रकाश कोर, शेतकरी, 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marigold flower become the income basis of core families