बाजार समित्यांवरही अंधश्रद्धेचे भूत; जादूटोणाविरोधी कायद्याला हरताळ 

विजय काळे
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज (20 ऑगस्ट) सहावा स्मृती दिन असून, त्यांना अखेरपर्यंत अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. मात्र, अजूनही समाजात आपल्याला विविध ठिकाणी लोक अंधश्रद्धा पाळत असल्याचे दिसते. तुम्ही आतापर्यंत कोणत्या अंधश्रद्धेला बळी पडला आहात? तुम्ही अंधश्रद्धा पाळता का? अंधश्रद्धेचे उच्चाटन होणे गरजेचे आहे का? जादूटोणा विरोधी कायद्याचे कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे का? याविषयी आम्हाला कळवा तुमची मते... webeditor@esakal.com या मेलवर पाठवा. Subject मध्ये Superstition लिहायला विसरू नका.

रेडगाव खुर्द (नाशिक) - अंधश्रद्धा- जादूटोणाविरोधी कायद्याला बाजार समित्या हरताळ फासत आहेत. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधून प्रत्येक अमावास्येला लिलाव बंद ठेवले जातात. विज्ञानयुग अन्‌ कायद्याच्या राज्यातही अंधश्रद्धेचे भूत बाजार समित्यांच्या मानगुटीवरून उतरायला तयार नसल्याने कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधून कांद्यासह अन्नधान्याची 20 कोटींची उलाढाल ठप्प होते. 

अंधश्रद्धा विरोधी कायद्यासाठी सोळा वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी संघर्ष केला. त्यांचा सहावा स्मृती दिन मंगळवारी (ता. 20) आहे. विधिमंडळाने 2013मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला, त्यास सहा वर्षे होत आली, तरीही वर्षभरातील बारा दिवस अमावास्येमुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवले जातात. त्यात प्रामुख्याने कांदा आणि अन्नधान्याच्या खरेदी- विक्री व्यवहाराचा समावेश आहे. अमावास्येला जोडून शनिवार, रविवार आल्यास चार दिवसांनी लिलाव सुरळीत होतात. सलग सुट्यांनंतर लिलाव पुन्हा सुरू होताच, शेतमालाची आवक वाढते आणि भाव गडगडतात. 

सहकार विभाग अनभिज्ञ 
अमावास्येला राज्यातील नेमक्‍या किती बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहतात, यासंबंधाने सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्या वेळी याबाबत सहकार विभाग अनभिज्ञ असल्याचे जाणवले. एवढेच नव्हे, तर लिलाव बंद करण्यासंबंधी व्यापारी पत्र देतात आणि त्यानुसार बाजार समिती निर्णय घेते, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पण, तरीदेखील अंधश्रद्धेच्या रुढी-परंपरा का पाळल्या जातात, याचे उत्तर मिळाले नाही. 

कांद्याची दैनंदिन उलाढाल (आकडे रुपयांमध्ये) 
4 कोटी 38 लाख लासलगाव 
3 कोटी 41 लाख पिंपळगाव बसवंत व सायखेडा 
1 कोटी चांदवड 

सहकाराचे राज्यातील जाळे 
307 मुख्य बाजार समित्या 
597 उप बाजार 

'व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेऊन आठ ते दहा महिन्यांपूर्वी उपबाजार वगळता पिंपळगाव बाजार समितीत अमावास्येला लिलाव सुरू केले आहेत. बाजार समित्यांनी शेतकरीहित डोळ्यांपुढे ठेवावे. विनाकारण अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये.'' 
- दिलीप बनकर (सभापती, पिंपळगाव बाजार समिती) 

'बाजार समित्यांनी साप्ताहिक आणि राष्ट्रीय सुटीचे दिवस वगळता एरवी कोणत्याही सबबीखाली कामकाज बंद ठेवू नये. तसेच, अमावास्या असल्याने लिलाव बंद राहील, असे फलक लावू नयेत. यासाठी बाजार समित्यांना पत्र दिले आहे.'' 
- गौतम बलसाने (जिल्हा उपनिबंधक, नाशिक)

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज (20 ऑगस्ट) सहावा स्मृती दिन असून, त्यांना अखेरपर्यंत अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. मात्र, अजूनही समाजात आपल्याला विविध ठिकाणी लोक अंधश्रद्धा पाळत असल्याचे दिसते. तुम्ही आतापर्यंत कोणत्या अंधश्रद्धेला बळी पडला आहात? तुम्ही अंधश्रद्धा पाळता का? अंधश्रद्धेचे उच्चाटन होणे गरजेचे आहे का? जादूटोणा विरोधी कायद्याचे कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे का? याविषयी आम्हाला कळवा तुमची मते... webeditor@esakal.com या मेलवर पाठवा. Subject मध्ये Superstition लिहायला विसरू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market Committee Superstition