esakal | सातपुड्याला "वळवा'ने झोडपले 
sakal

बोलून बातमी शोधा

Dhadgaon2

सध्या सातपुड्यात आंब्याची झाडे कैऱ्यांनी बहरली होती. ती दररोज तोडून त्याच्या चिऱ्या बनवून उन्हात वाळविण्याची कामे सुरू होती. अचानक झालेल्या या बिगरमोसमी पावसामुळे आंब्यांच्या झाडावरील कैऱ्या गळून पडल्या. अनेकांनी आंब्याच्या चिऱ्या आमचूर बनविण्यासाठी वाळायला टाकल्या होत्या. त्या पावसात सापडल्या.

सातपुड्याला "वळवा'ने झोडपले 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नंदुरबार ः बिगरमोसमी पावसाने आज दुपारी चारच्या सुमारास धडगावसह अक्कलकुवा तालुक्‍यातील सातपुड्यातील गावांना चांगलेच झोडपले. वादळ-वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक घरांवरील छत उडाले, पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, तर आंब्याची फळे गळून पडली, आमचूर पावसात सापडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

आज दुपारी दोनपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. नवापूर, नंदुरबार , शहादा, तळोदा व अक्कलकुव्याच्या सपाटीवरचा भागाला वगळून पावसाने "सातपुडा' गाठला. सातपुडा पर्वतरांगांतील धडगाव तालुक्‍यात व अक्कलकुवा तालुक्‍यातील गावांमध्ये दुपारी चारच्या सुमारास वादळ-वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दुपारपर्यंत कडकडीत ऊन होते. कोणालाही पाऊस येण्याचा अंदाज नव्हता. मात्र, अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस झाला. साधारण तासभर झालेल्या या पावसाने सातपुड्यातील गाव-पाड्यांना चांगले झोडपले. एवढेच नव्हे, तर जोरदार वादळ-वाऱ्यामुळे अनेक घरांवरील छते उडाली, छतावरील पत्रे लांब उडून पडले. गाव व रस्त्यांवरील मोठमोठे झाडे वादळामुळे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले. काही ठिकाणी वीजतारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने त्या तुटल्या आहेत, तसेच महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील ओवाह परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे त्या परिसरातही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

आंबे, आमचूर अन्‌ भुईमुगाचे नुकसान 
सातपुड्यातील शेतीच्या हंगामासोबतच उन्हाळ्यात आंब्यांचा व आमचूरचा हंगाम सर्वांत मोठा उलाढालीचा असतो. त्यातून लाखोंची उलाढाल होते. त्यासोबतच अनेक कुटुंबे आंब्याच्या उत्पन्नातून आपला उदरनिर्वाह भागवितात, तर अनेक जण आमचूर प्रक्रिया उद्योग करतात. सध्या सातपुड्यात आंब्याची झाडे कैऱ्यांनी बहरली होती. ती दररोज तोडून त्याच्या चिऱ्या बनवून उन्हात वाळविण्याची कामे सुरू होती. अचानक झालेल्या या बिगरमोसमी पावसामुळे आंब्यांच्या झाडावरील कैऱ्या गळून पडल्या. अनेकांनी आंब्याच्या चिऱ्या आमचूर बनविण्यासाठी वाळायला टाकल्या होत्या. त्या पावसात सापडल्या, तसेच सध्या धडगाव परिसरात शेतकरी भुईमूग पिकाची काढणी करत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या भुईमुगाचा शेंगा शेतात पडल्या होत्या, त्या पावसात भिजल्या. तसेच वर्षभर लागणारा चारा शेतात उघड्यावर पडला होता. तोही भिजला. त्यामुळे या पावसाने सातपुड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.