महिलेने रेल्वेतच दिला बाळाला जन्म 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

नंदुरबार : गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील दीड हजारांवर आदिवासी मजूर आज श्रमिक एक्‍स्प्रेसने नंदुरबारमध्ये परतले. यात डोंगरगाव येथील महिलेने रेल्वेतच बाळाला जन्म दिला असून, तिची व बाळाची प्रकृती स्थिर आहे. 

नंदुरबार : गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील दीड हजारांवर आदिवासी मजूर आज श्रमिक एक्‍स्प्रेसने नंदुरबारमध्ये परतले. यात डोंगरगाव येथील महिलेने रेल्वेतच बाळाला जन्म दिला असून, तिची व बाळाची प्रकृती स्थिर आहे. 

या मजुरांना आपल्या गावी आणण्यासाठी पालकमंत्री ऍड. के. सी. पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मजुरांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 52 बसने त्यांच्या गावी पाठविण्यात आले. तत्पूर्वी, त्यांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हातांवर "होम क्वारंटाइन'चा शिक्का मारण्यात आला, तसेच त्यांना "कोरोना' प्रतिबंधासाठी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पालकमंत्री ऍड. पाडवी यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन सचिवांना पत्र दिले होते. त्यांनी गुजरातमधील प्रशासनाशीदेखील संपर्क साधला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी यासंदर्भात जुनागढ येथील प्रशासनाशी समन्वय साधला. 

जुनागढमधून दीड हजार मजूर परतले 
डोंगरगाव (ता. शहादा) येथील सरिता ठाकरे हिने बुधवारी (ता. 13) रात्री श्रमिक एक्‍स्प्रेसमध्ये कन्येला जन्म दिला. या महिलेला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून तिला मूळ गावी पोचविण्यात येणार आहे. परतलेल्या मजुरांमध्ये अक्कलकुवा तालुक्‍यातील 27, तळोदा तालुक्‍यातील 253, धडगाव तालुक्‍यातील 22, नंदुरबार तालुक्‍यातील 80, नवापूर तालुक्‍यातील सात आणि शहादा तालुक्‍यातील एक हजार 101, असे नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार 490 प्रवासी होते. शिरपूर येथील दहा मजूरही याच रेल्वेने परतले. मजुरांच्या तिकिटाचा खर्च सहा लाख 37 हजार 500 रुपये "न्यूक्‍लिअस बजेट'मधून करण्यात आला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marthi news nandurbar The woman gave birth to the baby on the train