निकषात फिट, तरीही रुळावरील मेट्रोसाठी अनफिट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मेट्रो शक्‍य असताना टायरबेस का?
ज्या शहरात रुळावरील मेट्रो सुरू करायची आहे, त्या शहराची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. महामेट्रोतर्फे शहरात टायरबेस मेट्रो सुरू करताना २३ लाख लोकसंख्या दर्शविली असताना रुळावरील मेट्रोचे नियोजन का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नाशिक - शहरात मेट्रो धावण्यासाठी ताशी प्रवाशांची संख्या व वीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या हे दोन निकष महत्त्वाचे मानले जातात. नाशिक शहर या दोन्ही निकषांत बसत असताना याकडे दुर्लक्ष करत मेट्रोसाठी योग्य नसल्याचा अहवाल देण्यात आला. त्यातून टायरबेस मेट्रोचा पर्याय देण्यात आला. प्रवाशांच्या संख्येचा विचार करता सर्वेक्षण झाले कधी?, हे नाशिककरांना कधी समजले नाही. एका खासगी संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी केलेला सर्वंकष वाहतुकीचा आराखडा चुकीचा ठरविल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एकीकडे शहर बससेवा महापालिकेतर्फे चालविण्याचे प्रयत्न होत आहेत. आता देशातील पहिली टायरबेस मेट्रो सुरू करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. परंतु नाशिकमध्येसुद्धा रुळावरील मेट्रो धावणे शक्‍य असताना टायरबेस मेट्रोचा आग्रह का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जानेवारीत नाशिकमध्ये मेट्रो सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी महामेट्रो, सिडको व महापालिकेला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शासनाकडे अहवाल कधी पोचला, हेही माहीत नाही. महामेट्रोने शासनाला सादर केलेल्या अहवालात नाशिक शहरात ताशी ७ ते १४ हजार प्रवाशी उपलब्ध होतात.

मेट्रोच्या निकषामध्ये ताशी वीस हजार प्रवाशी उपलब्ध होणे गरजेचे असल्याने या निकषातून नाशिक वगळले गेले. त्यामुळे टायरबेस मेट्रोचा पर्याय समोर आला. मुळात नाशिक महापालिकेने यापूर्वी सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यात सार्वजनिक बसच्या माध्यमातून दररोज १.२३ लाख प्रवाशी प्रवास करत असल्याचे नमूद केले होते. शहरात २०१६ पर्यंत सात लाख ३२ हजार खासगी वाहने असल्याने त्यातूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यामुळे रुळावरील मेट्रोच्या निकषात नाशिक शहर जाणूनबुजून वगळल्याचा संशय व्यक्त होतोय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro Project Issue in Nashik