दूध उत्पादनातून आर्थिक सुधारणेकडे..

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

मनमाडच्या तरुण शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाकडे कल वाढला असून, हजारो तरुण शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाचा पूरक व्यवसाय करून कुटुंबाला मोठा आधार देत आहेत. पावसावर आधारित शेती त्यात दुष्काळाचा फटका अशात या भागातील तरुण शेतकऱ्यांनी खचून न जाता बेरोजगारीला दूर सारत दूध उत्पादन करण्यावर भर दिला आहे. याचा चांगला परिणामही समोर येत आहे. 

मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन व्यवसायाकडे वळले आहे. पूर्वी शहरात घरोघरी दूध वाटपासाठी शेतकरी सायकलवर येत. मात्र, कालांतराने प्रत्येकाकडे पशुधन वाढले, साधने उपलब्ध झाली. त्यामुळे दूध वाटपाचे काम तरुणवर्ग करू लागले. शेतीत उत्पन्न मिळत नसले तरी दुधात उत्पन्न मिळते, ही बाब लक्षात येऊन तरुणांमध्ये दूध उत्पादनाबाबत विश्वास निर्माण झाला. 

तरुण शेतकऱ्यांची दूध व्यवसायात रुची वाढली
आज हजारो तरुण दूध व्यवसायाकडे वळले आहे. अनेकांनी आपल्या शेतात दुभत्या संकरित गाई व म्हशी घेतल्या. दुधाला चांगला भाव मिळणे व विकलेल्या दुधाचा मोबदला वेळेवर हाती येणे, यामुळे तरुण शेतकऱ्याना दूध व्यवसायात रुची वाढत गेली. ठरल्या वेळी रोज सकाळ संध्याकाळ दुचाकीवरून येऊन, दूध संकलन केंद्र, दूध डेअरी, आईस्क्रीम, ज्यूस सेंटर, हॉटेल, चहा हॉटेल, खवा तयार करणारे अथवा घरोघरी दूध देऊन वेळेत घरी जाता येते. रोख अथवा महिन्याला पैसे हाती येऊ लागले. यामुळे तरुणांच्या दूध उत्पादन क्षेत्रातील वाढत्या कलाचा चांगला फायदा या तरुण शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा होण्यास झाला.

दररोज अंदाजे वीस हजार लिटर दूधाचे संकलन

या भागातील दूध संकलन केंद्रावर रोज अंदाजे वीस हजार लिटर दूध संकलन होत असते. दूध उत्पादनामध्ये जवळपास तीन हजार तरुण शेतकरी सक्रिय झाले आहे. दूध उत्पादनामुळे पशु संवर्धनाला देखील महत्त्व आले आहे. या पूरक व्यवसायामुळे तरुणांमध्ये उत्साह वातावरण असून, दूध व्यवसाय करतांना शेती देखील करता येते. या परिसरात सतत कमी पाऊस होण्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांमध्ये ज्या तरुणांनी दूध उत्पादनाचा पूरक व्यवसाय सुरू केला त्यांना चांगला दिलासा मिळत आहे. 

मोठे घर पोकळ वासा'
नांदगाव तालुक्यात मनमाड हे एकमेव मोठे शहर आहे येथे दळणवळणाची सर्व साधने आहे, राज्य, राष्ट्रीय महामार्ग, इंधन कंपन्या, रेल्वे स्टेशन, रेल्वे कारखाना, एफसीआय धान्य गोदाम रोजगार मिळेल आशा सुविधा येथे दिसत असल्या तरी मात्र याचा शहरी आणि ग्रामीण तरुणांना काहीच फायदा नाही 'मोठे घर पोकळ वासा' काहीसा असाच प्रकार आहे आजही हजारो तरुण रोजगाराच्या शोधात नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी शहराची वाट धरतात. सुशिक्षित आहे पण तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण शेतकरी दूध उत्पादनाकडे वळतांना दिसत आहे 

शहरातील दुधाचा आर्थिक फायदा तीनही तालुक्याला
मनमाड शहराची भौगोलिक रचनाच अशी आहे की हे शहर तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर वसलेले आहे. नांदगाव, येवला आणि चांदवड. मालेगाव, नाशिक शहराशी व्यापारी संबंध आहे या तीन तालुक्यांचा मोठा ग्रामीण भाग त्यातील गावे ही मनमाड शहराशी व्यापार दृष्टीने जोडली गेली आहे. येवला, चांदवड, मालेगाव, नांदगावला जाण्याऐवजी मनमाड जवळचे असल्याने या भागातील दूध हे मनमाड शहरात येऊ लागले. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे येऊ लागले. मनमाड शहरातील दुधाचा आर्थिक फायदा हा तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे 

व्यवसायाला चालना देण्याची गरज
तीनही तालुक्यातून दूध पुरवठा होत असल्याने येथे दूध उत्पादन वाढले रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तरुण शेतकऱ्यांचा या पूरक व्यवसायाकडे कल वाढला. त्यामुळेच येथे काहींनी उद्योग सुरू केले आहे. जसे लकी ज्युस सेंटर, आनंद विलास ज्यूस सेंटर आणि विशेष म्हणजे आईसस्क्रीम कारखाना येथे सुरू झाला. येथील आईस्क्रीम प्रसिद्ध आहे. दूध उत्पादन होऊ लागल्याने या भागात तयार झालेल्या खव्याला येवला, चांदवड, मालेगाव, नाशिक कोपरगाव आदी भागात चांगली मागणी आहे तर या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी येथे दूध डेअरी सुरू केल्या आहेत. या व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारी योजनांची माहिती देणे, संकरित गाईंची संख्या वाढवणे, गायी/ म्हशींचे रोग व आजार लसीकरण प्रक्रियेद्वारे टाळणे, गुरांना सकस खाद्य देणे, उत्पादकांना गुरांच्या संगोपनाबाबत प्रशिक्षण देणे, दूध संकलन आणि दूध प्रक्रिया सुविधा वाढवणे या उपाययोजनांची आवश्यकता आहे. दुग्ध व्यवसायात सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर, चांगल्या योजना, चांगल्या गुणप्रतीची दूध निर्मिती आणि वितरण, मजुरांची उपलब्धता, चाऱ्याचा अभाव, भांडवलाची उपलब्धता, दुधाचा दर याबरोबरच समाजाचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन या उणीवा आणि समस्यां जाणवतात

प्रतिक्रिया - 
1) पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक तरुण शेतकरी हवालदिल झाले आहे शिक्षण करण्यासाठी पैसे नाही नोकरीची कोणतीही हमी नाही त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा दूध व्यवसाय करणे अधिक चांगले यामुळे शेतीकडेही लक्षही देता येते आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी हा पूरक व्यवसाय फायदेशीर आहे
- सुरेश काकड, तरुण शेतकरी दूध उत्पादक

2) या पूरक व्यवसायामुळे तरुण शेतकऱ्यांमध्ये दुधाचे महत्त्व वाढले असून, पशुसंवर्धनाबद्दल आपुलकी निर्माण होत आहे. तरुणांनी यामध्ये आवड दाखवल्यामुळे शेतामध्ये पुन्हा गाई व म्हशी पालन करण्याचे प्रमाण वाढले आहे. दूध उत्पादनातील आर्थिक फायदा त्यांच्या कुटुंबाला, शेतीला होत आहे.
- राजू सानप, शेतकरी, श्रीकृष्ण दूध डेअरी चालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From milk production to financial reform in manmad