जळगाव कलेक्‍टर टोचतात सिव्हील यंत्रणेचे कान..तेव्हा !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

जिल्हा रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्या सोबतच कर्मचाऱ्याविषयी असलेल्या तक्रारीबाबत कठोरतेने कारवाईच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी महाविद्यालयाचे डीन डॉ. खैरे यांना केल्या. नुसते निलंबनच नाही तर संबंधिताना बर्डतर्फीची कारवाई करावी, असेही डॉ. ढाकणेपुढे म्हणाले. 

जळगाव, : जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्डबॉयने रुग्णाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराविषयी "सकाळ'ने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना विचारणा केली असता त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात "सरप्राईज व्हिजिट' दिली. यावेळी केलेल्या पाहणीत मुख्य वैद्यकीय अधिकारीच गैरहजर असल्याचा गंभीर प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना आढळून आला. वॉर्डातील अस्वच्छता, पानगुटख्याच्या पिचकाऱ्यांसह वॉर्डात दाखल रुग्णाकडून अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर प्रकार डॉ. ढाकणेंच्या निदर्शनास आला. 

जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या पत्नीचा विनयभंग केल्याच्या घटनेबाबत "सकाळ'च्या प्रतिनिधीने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना दूरध्वनीवरून विचारणा केल्यावर त्यांनी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी चोवीस तास मुख्य वैद्यकीय अधिकारी हजर असणे अपेक्षित असताना वॉर्ड क्रमांक एकमध्ये उपस्थित डॉ. भोळे या शिकाऊ डॉक्‍टरांच्या भरवशावर सोडून गेल्याचे त्यांना आढळून आले. विचारणा केल्यावर डॉ. भोळेंची ड्यूटी असल्याचे उपस्थितांनी सांगितल्यावर व्यक्तिश: त्यांना संपर्क केल्यावरही त्या येऊ शकल्या नाहीत. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे आल्याची माहिती झाल्यावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. भास्कर खैरे यांनी धाव घेतली. तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी महिला वॉर्डसह इतर वॉर्डांची पाहणी केली होती. एक-दोन वॉर्ड वगळता प्रत्येकच वॉर्ड गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगवलेले आढळल्याने याबाबत डॉ. ढाकणे यांनी नाराजी व्यक्त करीत कारवाईच्या सूचना दिल्या. 

पैसे देऊ नये 
रुग्णांच्या नातेवाइकांकडून वैद्यकीय तपासण्या आणि शस्त्रक्रियांसाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाइकांसह सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यासमक्ष केल्याने डॉ. ढाकणे यांनी सक्त सूचना देत कोणीही रक्ततपासणी किंवा इतर तपासण्या व शस्त्रक्रियांसाठी अतिरिक्त पैसे कोणालाही देऊ नये, असे जाहीरपणे सांगत जनतेला आवाहन केले. 

 रुग्ण वाऱ्यावर 
जिल्हा रुग्णालयात बहुतांश वॉर्डात अतिरिक्त रुग्ण दाखल झाल्यावर खाटांची कमतरता जाणवते. परिणामी, अशा रुग्णांना खाली किंवा एका पलंगावर दोन झोपवण्यात येते. वरांढ्यात झोपलेल्या रुग्णाची डॉ. ढाकणे यांनी चौकशी करून याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांना विचारणा करण्यात आली. 

प्रवेशद्वारावर तपासणी 
जिल्हा रुग्णालयात सर्वत्र गुटखा-पान तंबाखू थुंकल्याचे आढळून आले. एक-दोन वॉर्ड सोडले तर जवळपास सर्वच वॉर्डात अस्वच्छता, गाद्या फाटलेल्या, खिडकीत अन्न सांडल्याचे चित्र होते. परिणामी, प्रवेशद्वारावरच गुटखा-पान तंबाखू खाणाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना डॉ. खैरे यांना करण्यात आल्या आहेत. 

बडतर्फीच्या सूचना 
जिल्हा रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्या सोबतच कर्मचाऱ्याविषयी असलेल्या तक्रारीबाबत कठोरतेने कारवाईच्या सूचना डॉ. ढाकणे यांनी महाविद्यालयाचे डीन डॉ. खैरे यांना केल्या. नुसते निलंबनच नाही तर संबंधिताना बर्डतर्फीची कारवाई करावी, असेही डॉ. ढाकणेपुढे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: miss manejment in jalgaon civil hospital