आमदार लागले कामाला..द्राक्ष उत्पादकांना दिला दिलासा

रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका बागलाण तालुक्याला सुद्धा बसला आहे. नवनिर्वाचित आमदार बोरसे यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष द्राक्ष बागांची पाहणी केली. पाहणीदरम्यान लांबलेला पावसाळा, धुके आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षांचे १८०० हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.

नाशिक  : अर्ली द्राक्षांची पंढरी म्हणून जगभरात ओळख असलेल्या बागलाण तालुक्यात परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे गेल्या आठवडाभरात द्राक्ष, डाळिंब यांसह इतर प्रमुख पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बागलाणचे नवनिर्वाचित आमदार दिलीप बोरसे यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. आमदार बोरसे यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत लवकरच शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 

अठराशे हेक्टरवरील द्राक्षबागांचे नुकसान,

राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका बागलाण तालुक्याला सुद्धा बसला आहे. तालुक्यातील लखमापुर, ब्राह्मणगाव, आराई, ठेंगोडा, मोरेनगर, सटाणा, औंदाणे, भाक्षी, मुळाणे, तरसाळी, वनोली, विरगाव, डोंगरेज, वटार, चौंधाणे, कंधाणे, निकवेल, जोरण, किकवारी, तळवाडे दिगर, दसाने, विरगावपाडे, कर्हे, मुंगसे, पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, निताणे, लाडूद, बिजोटे, गोराणे, कोटबेल, कूपखेडा, खिरमाणी, नळकस, अंबासन, टेंभे, श्रीपुरवडे, ब्राह्मणपाडे, जायखेडा, सोमपुर आदी गावांमधील द्राक्ष, डाळिंब बागा उध्वस्त झाल्या असून खरीपासह भाजीपाला पिके, उन्हाळी कांद्याचे रोपे (उळे) पावसामुळे सडून गेले आहेत. यामुळे कोट्यावधींचे नुकसान झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

परतीच्या पावसाचा तडाखा..आमदारांनी दिला दिलासा..
नवनिर्वाचित आमदार बोरसे यांनी (ता.२६) तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष द्राक्ष बागांची पाहणी केली. पाहणीदरम्यान लांबलेला पावसाळा, धुके आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षांचे १८०० हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या सूचनाही आमदार.बोरसे यांनी यावेळी कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

यावेळी द्राक्ष उत्पादक किशोर खैरनार, रवींद्र ठाकरे, बापू खैरनार, पंकज ठाकरे, हेमंत खैरनार, राजेंद्र खैरनार, संभाजी खैरनार, लक्ष्मण पवार, मुरलीधर पवार, शिवाजी रौंदळ, गोपाळ भामरे, भगवान अहिरे, हेमंत पवार, काळू अहिरे, कैलास सोनवणे, अनिल निकम, सुनील निकम, कृष्णा भामरे, शंकर भामरे, काकाजी शेवाळे, खंडू शेवाळे, दिलीप शेवाळे, राजेंद्र जाधव, अभिमन जाधव, पोपट जाधव, युवराज पवार, बापू देवरे, संजय देवरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, आज रविवारी (ता.२७) सटाणा येथील सुर्या लॉन्स येथे दुपारी तीन वाजता धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे व बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस अधिकाधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही आमदार बोरसे यांनी केले आहे.

मी स्वतः शेतकरी असल्याने नुकसानीची मला जाणीव

मी स्वतः द्राक्ष उत्पादक शेतकरी असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या नुकसानीची मला जाणीव आहे. परतीच्या पावसामुळे बागलाण तालुक्यात १८०० हेक्‍टर द्राक्ष पिकाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी आज अखेर ८५० हेक्‍टर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. येत्या दोन दिवसात उर्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या नुकसानीबाबत प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे अधिकाधिक नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी करणार आहे. - दिलीप बोरसे, आमदार, बागलाण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Dilip Borse inspects damaged grapes