esakal | मनसेचे 'इंजिन' पुन्हा सुरु; वाचा किती आमदार आले निवडून!
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेचे 'इंजिन' पुन्हा सुरु; वाचा किती आमदार आले निवडून!

मनसेचे राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला असून, अन्य काही उमेदवारांनी लक्षणीय मते घेतल्याने राज्यातील अनेक मतदारसंघांत मनसेमुळे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

मनसेचे 'इंजिन' पुन्हा सुरु; वाचा किती आमदार आले निवडून!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कोणत्याही निवडणुकीत कायमच चर्चेत असेलेले नेते राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा फक्‍त एका आमदाराचे बळ मिळाले.

मनसेचे राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला असून, अन्य काही उमेदवारांनी लक्षणीय मते घेतल्याने राज्यातील अनेक मतदारसंघांत मनसेमुळे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. काँग्रेस आघाडीने राज ठाकरे यांनासोबत घेतले असते तर मनसे आणि आघाडीच्याही जागा वाढल्या असत्या, असे निकालांवरून दिसत आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. याच आधारावर मनसेला 2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळाले.

पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण 13 आमदार निवडून आले. मनसेला तेवढ्याच म्हणजे आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली होती; तर एकोणतीस जागांवर "मनसे'चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र "मनसे'ची जोरदार पीछेहाट होत फक्‍त जुन्नर या एकमेव मतदारसंघातून मनसेचा आमदार निवडून आला होता. या आमदारानेही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेची पाटी कोरी झाली.

दरम्यान, राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कॉंग्रेस आघाडीत समाविष्ट करण्याची चर्चा होती. मात्र कॉंग्रेसने कच खाल्ल्यामुळे मनसेने निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला. या वेळी पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसताना राज ठाकरे यांनी मोदी-शहाविरोधात प्रचारसभा घेत राज्यातील वातवारण ढवळून काढले.

विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेस आघाडीत मनसेला घेण्याची चर्चा सुरू होती. मात्र, याबाबत काहीही हालचाल झाली नसल्याने राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. विधानसभा निवडणुकीत मनसेने 125 च्या आसपास उमेदवार उभे केले होते. अनेक ठिकाणी मनसे उमेदवारांनी तुल्यबळ लढत दिली. राज्यातील गाजलेल्या मतदारसंघांपैकी पुण्याच्या कोथरूडमध्ये मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मनसेच्या किशोर शिंदे यांनी घाम फोडला. 

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांच्यासह वसंत मोरे, गजानन काळे, अविनाश जाधव, कर्नबाळा दुनबळे, संदीप देशपांडे, अखिल चित्रे आदी उमेदवारांना सत्ताधाऱ्यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले होते. आघाडीच्या पाठिंब्याचा फायदा फक्‍त कल्याण ग्रामीण मतदारसंघात झाल्याचे दिसून येते. मनसेमुळे चांदीवली मतदारसंघात कॉंग्रेसचे नसीम खान, चेंबूरमध्ये चंद्रकांत हंडोरे, मालाड येथे आस्लम शेख यांचा पराभव झाला.

loading image