मनसे ठरणार किंगमेकर? नाशिक महापालिका सत्तेचा सुकाणू मनसेच्या हाती ! 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 21 November 2019

सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता शिवसेना हे बळ एकवटू शकते. तर भाजपकडे तीन नगरसेवकांची संख्या कमी पडू शकते. त्यामुळे भाजपला मनसेच्या टेकूची गरज भासेल. मनसेने भाजपला ताकद दिल्यास भाजपची सत्ता महापालिकेत शक्‍य आहे. त्यामुळे सध्या तरी मनसे किंगमेकरच्या भूमिकेत येताना दिसत आहे. 

नाशिक : महापालिकेत भाजपचे बहुमत असले तरी पक्षाचे काही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात गेल्याने महापालिकेच्या सत्ताकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत महापालिकेची सत्ता भाजपकडून खेचली जाणार की शिवसेनेच्या रूपाने सत्तांतरण होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आकड्यांची जुळवाजुळव लक्षात घेता सहा सदस्यसंख्या असलेल्या मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तटस्थ राहिल्यास बहुमताचा आकडा खाली येणार आहे, तर मतदानात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास त्या पक्षाचा महापौर होणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. 

तटस्थ राहिले तर भाजप, शिवसेना; मतदान केल्यास कोणत्याही एका पक्षाला फायदा 

पक्षाच्या सूचना नसतानाही महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा पार करण्यासाठी भाजप व शिवसेनेची धडपड सुरू झाली आहे. महापालिकेत एकूण 122 नगरसेवक आहेत. त्यातील दोन नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने 120 नगरसेवकांमधून बहुमत तपासले जाईल. सद्यःस्थितीत भाजपचे 65, शिवसेनेचे 34, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी सात, मनसेचे सहा व रिपाइंच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. भाजपचे दहा नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या 55 वर येते. दुसरीकडे शिवसेनेसह संपर्कात असलेले भाजपचे दहा, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस, तसेच रिपाइं मिळून असे 59 नगरसेवक शिवसेनेकडे असल्याचे बोलले जात आहे. या परिस्थितीत मनसे तटस्थ राहिल्यास 114 नगरसेवकांमधून महापौराची निवड करावी लागेल. त्यासाठी 58 नगरसेवकांचे बळ लागेल. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता शिवसेना हे बळ एकवटू शकते. तर भाजपकडे तीन नगरसेवकांची संख्या कमी पडू शकते. त्यामुळे भाजपला मनसेच्या टेकूची गरज भासेल. मनसेने भाजपला ताकद दिल्यास भाजपची सत्ता महापालिकेत शक्‍य आहे. त्यामुळे सध्या तरी मनसे किंगमेकरच्या भूमिकेत येताना दिसत आहे. 

मनसेची कोअर कमिटी बैठक 
महापालिकेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता मनसेच्या चार नगरसेवकांना मुंबईत सहलीला पाठविले आहे. तटस्थ राहायचे की मतदानात सहभागी व्हायचे, याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (ता. 21) कोअर कमिटीच्या बैठकीत जाहीर करतील. त्यानुसार मनसेची भूमिका ठरेल. 

दावे-प्रतिदावे 
भाजपचे दहापेक्षा अधिक नगरसेवक शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे भाजपकडूनही महाशिवआघाडीचे चार नगरसेवक गळाला लागल्याचे बोलले जात आहे. त्याच आधारे भाजपला सत्ता स्थापनेचा विश्‍वास असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेसोबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस असल्याचे सांगितले जात असले तरी तीनही पक्षांच्या प्रमुखांची अद्याप बैठक झाली नसल्याचे सांगितले जात आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Nashik Munciple Corporation Political News