Money Fraud : मुदतठेवीतील 50 लाख हडप; बॅंक अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money Fraud

Money Fraud : मुदतठेवीतील 50 लाख हडप; बॅंक अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : स्टेट बॅंकेत फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवल्याने जास्तीचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ठेवीदाराने ठेवलेल्या खात्यावरील पन्नास लाखांची रक्कम दोघांनी परस्पर काढून ठेवीदाराची फसवणूक केली. ही बाब ठेवीदार पैसे काढण्यासाठी बॅंकेत गेल्यावर बॅंकेतील खात्यावर पैसेच नाहीत, मात्र बॅंकेच्या पुस्तकावर पैसे भरल्याची खोटी नोंद केल्याचे आढळून आले. याबाबत नवापूर तालुक्यातील दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला.

हेही वाचा: Nashik Crime News : दागिने बनविण्याच्या बहाण्याने सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

सोनखडका (ता. नवापूर) येथील संदीप कांतिलाल गावित (वय ४०) या शेतकऱ्यास जानेवारी २०२० पासून ते आजपावेतो झामणझर (ता. नवापूर) येथील जयसिंग दिवाणजी गावित याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवापूर शाखेत पैसे मुदतठेव केल्यावर चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखविले. त्यामुळे त्यांनी नवापूर येथील स्टेट बँक शाखेत वेळोवेळी पैसे जमा केले. त्या वेळी जयसिंग गावित याने कॅश काउंटरवर संदीप गावित यांच्यासोबत जाऊन पैसे भरणा केल्याच्या पावत्या दिल्या.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

काही जणांकडून रोख रुपये घेऊन त्यांना त्यांच्या नावाने धनादेश देऊन पैसे भरणा केल्याच्या पावत्या दिल्या आहेत. संदीप गावित व त्यांचे काही मित्र यांच्या पासबुकवर पैसे जमा असल्याच्या नोंदी स्वतः करून दिल्या. संदीप गावित व त्यांच्या मित्रांनी बँकेत जाऊन त्यांच्या खात्यावरील पैशांची चौकशी केली असता खात्यावर पैसे शिल्लक नसल्याचे आढळले. त्यांचे पैसे जयसिंग दिवाणजी गावित, रविकांत नकुल वळवी व बँकेतील तत्कालीन इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांच्या संमतीशिवाय खात्यातून ४९ लाख ८९ हजार ४७२ रुपये काढून घेऊन अपहार करीत ठेवीदारांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे.

हेही वाचा: Online Fraud : पोलिस निरीक्षकालाच बसला ऑनलाईन गंडा

याबाबत संदीप कांतिलाल गावित यांनी नवापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंग दिवाणजी गावित, रविकांत नकुल गावित व तत्कालीन बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे तपास करीत आहेत.