राज्यसेवेच्या जागा वाढल्याने विद्यार्थी खूश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

इगतपुरी (जि. नाशिक) - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेच्या ३४२ पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच मराठा आरक्षणांतर्गत (सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग) २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत (६९ जागा) यंदा जागांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी (४० जागा), पोलिस उपअधीक्षक (३४ जागा), सहायक संचालक-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (१६ जागा), उद्योग उपसंचालक (२ जागा), तहसीलदार (७७ जागा), उपशिक्षणाधिकारी (२५ पदे), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (३ जागा), कक्ष अधिकारी (१६ जागा), सहायक गटविकास अधिकारी (११ जागा), उद्योग अधिकारी (५ जागा), नायब तहसीलदार (११३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. पूर्वपरीक्षेसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.

पूर्वपरीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ ला ३७ केंद्रांवर होईल. पूर्वपरीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची १३ ते १५ जुलै २०१९ मध्ये मुख्य परीक्षा होईल.  राज्यसेवेअंतर्गत २८ विविध प्रकारच्या पदांची भरतीप्रक्रिया राबविली जाते. यंदा ११ संवर्गातील ३४२ रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली. पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत जागांमध्ये वाढ होऊ शकते.

जातप्रमाणपत्र आवश्‍यक
मराठा आरक्षणाच्या (सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग) प्रवर्गातील उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी (मुलाखतीच्या वेळेस) ७ डिसेंबर २०१८ अन्वये विहित करण्यात आलेले जातप्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक असणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी १५ जुलै २०१४ अन्वये जातप्रमाणपत्र काढले असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Web Title: MPSC Seat Increase Student