लेखा परीक्षकाला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नांदगाव - पालिकेच्या लेखा परीक्षणात दफ्तर तपासणी व त्यावर चांगला अभिप्राय नोंदविण्यासाठी लिपिकाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या स्थानिक लेखा परीक्षण विभागातील कनिष्ठ लेखा परीक्षक संजय रघुनाथ बुरकूल व शिपाई राजेंद्र पाटील या दोघांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने दुपारी ही कारवाई केली. नांदगाव पालिकेचे लेखा परीक्षण सुरू आहे. त्यात, पाणीपट्टीच्या हिशेबाच्या चांगला अहवाल व अभिप्रायासाठी बुरकूल याने पाणीपुरवठा विभागातील लिपिक राजेंद्र गरुड यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यावर गरुड यांनी नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून बुरकूल आणि पाटील यांना पकडण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nanggaon nashik news auditor arrested in bribe case