आंबोली धरणाजवळ पर्यटन विकासातून रोजगाराची संधी होईल उपलब्ध 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

नाशिक ः "पेसा'तंर्गतच्या त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रस्त्यावरील आंबोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावाने तंटामुक्त अन्‌ आय. एस. ओ. चा बहुमान मिळवला आहे. गावाला अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट दिल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

नाशिक ः "पेसा'तंर्गतच्या त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रस्त्यावरील आंबोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावाने तंटामुक्त अन्‌ आय. एस. ओ. चा बहुमान मिळवला आहे. गावाला अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट दिल्याचे ग्रामस्थ सांगतात. 
आंबोली धरणाजवळ पर्यटन विकासातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे शेजारील पाड्यांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे. बाराशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावात मारुती, मरीआई, चोटोबाबा, विठोबा-रुखमाई मंदिर आहे. गावात मरीआई मंदिरात पाडव्याला यात्रोत्सव होतो. गावात शिवजयंती हर्षोल्हासात साजरी केली जाते. दर महिन्याला गावात कीर्तन होते. कीर्तनकार संदीप महाराज ही सेवा बजावतात. गावातील भजनी मंडळ मोठे असून ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. भजनी मंडळात तानाजी कड, नामदेव मेढे, दत्तू मेढे, लक्ष्मण मेढे, दौलत मेढे, पंढरी मेढे, कचरु मेढे, गंगा मेढे आदींचा सहभाग असतो. सोनू मेढे हा मल्ल आंतरराष्ट्रीयस्तरावरील कुस्त्या गाजवत आहे. 
गावात पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन शाळा आहेत. आदिवासी मुलांसाठी निवासी आश्रमशाळा आहे. आंबोली धरणामुळे गावाला बारमाही पाणी मिळते. मात्र गावात वाचनालय आणि व्यायामशाळा नाही. गावाजवळ दोन डोंगर असून जैव विविधतेचा मोठा खजिना उपलब्ध आहे. डोंगराजवळ कोल्हे, बिबट्या, रानडुक्कर यांचा वावर असतो. गावात वाद्यकलावंत आहेत. सोना ताठे, राजू ताठे, बाळू ताठे यांच्यासह वीस कलावंतांचा त्यात समावेश आहे. 

गावाजवळील आंबोली धरणामुळे गावाला पाण्याची अडचण येत नाही. धरण आणि धरणासमोरील दोन डोंगर परिसरात मोठे जंगल आहे. अनेक वृक्ष या परिसरात आहेत. वन्यप्राणी पाह्यला मिळतात. इथे पर्यटन विकास होणे आवश्‍यक आहे.
- लंकाबाई मेढे (उपसरपंच) 
 

माझ्याकडे गाई-म्हशी आहेत. तसेच जंगलात अनेक वनौषधी वनस्पती आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून दुग्धोत्पादन केले जाते. त्यामुळे गावात पशुवैद्यकीय दवाखाना व्हायला हवा. तसेच शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाविषयी माहिती व्हावी म्हणून कार्यशाळा व्हायला हव्यात. 
- हिरामण मेढे (ग्रामस्थ) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik-Aamboli-village