नाशिकच्या सोळाव्या महापौरपदी कुणाची वर्णी? उत्सुकता शिगेला.. 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 22 November 2019

महापालिकेत भाजपकडे बहुमत आहे, पण माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सत्तास्थापनेच्या खेळात भाजपकडून ताकही फुंकून पिले जात आहे. भाजप व शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला असला, तरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

नाशिक : महापालिकेत भाजपकडे बहुमत असले तरी दहापेक्षा अधिक नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने सोळाव्या महापौरपदी कोण बसणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. भाजपचे नगरसेवक फुटल्याचा दावा केला जात असला, तरी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे बळ असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठण्याइतपत नगरसेवक असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे मनसेसह कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, नाशिकच्या सत्तेच्या राजकारणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

 सगळे काही आकड्यांच्या गणितावरच... 

महापालिकेत दोन सदस्यांनी राजीनामे दिल्याने सद्यःस्थितीत 120 नगरसेवक आहेत. त्यात भाजपचे 65, शिवसेना 34, अपक्ष मिळून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी सात, तर मनसेचे सहा व रिपाइंचा एक नगरसेवक आहे. 61 मतदान ज्या उमेदवाराला पडेल, तो शहराचा सोळावा महापौर व उपमहापौर होईल. भाजपकडे 65 नगरसेवक असले, तरी दहा नगरसेवक शिवसेनेच्या गटात दाखल झाल्याचे बोलले जाते. अशा वेळी 55 सदस्य बळ शिल्लक राहते. मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास 58 सदस्यसंख्या असलेल्या पक्षाचा महापौर बनेल. शिवसेनेचे 34, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी सात मिळून 14 व सानपसमर्थक दहा नगरसेवक व रिपाइंचा एक नगरसेवक, असे 59 सदस्य शिवसेनेकडे असल्यास शिवसेनेला संख्याबळाच्या आधारे सत्ता मिळविता येईल. 

मनसे, कॉंग्रेसवर बरेच अवंलबून 

मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास बहुमताचा आकडा 58 पर्यंत येत असल्याने अशा परिस्थिती शिवसेनेला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व सानपसमर्थक नगरसेवकांनी साथ दिल्यास शिवसेनेला सत्ता मिळविणे अवघड नाही. मनसेने भाजपला मतदान केल्यास नगरसेवक फुटूनही भाजपला सहज बहुमत प्राप्त करता येईल. शिवसेनेला कॉंग्रेसच्या मतांची अपेक्षा असली, तरी रात्री उशिरापर्यंत कॉंग्रेसकडून कुठलाच निर्णय झालेला नाही. कॉंग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास राष्ट्रवादी व सानपसमर्थक नगरसेवकांच्या बळावर शिवसेनेचे सत्तास्थापनेचे मनसुबे आहेत. पण कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले असून, काही नगरसेवकांनी शिवसेनेला थेट मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर... 
- रात्री उशिरापर्यंत घोडेबाजाराला वेग. 
- भाजपचे नगरसेवक इगतपुरीतील मानस रिसॉर्टमध्ये मुक्‍कामी. 
- शिवसेनेचे नगरसेवक हॉटेल एक्‍स्प्रेस इनमध्ये रात्री उशिरा दाखल. 
- मनसेचे नगरसेवक घोटीतील रिसॉर्टवर. 
- कॉंग्रेसचे नगरसेवक घोटीच्या रिसॉर्टवर. 
- सर्व पक्षांच्या नगरसेवकांना बजावला पक्षादेश (व्हीप). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Municipal Corporation Election Nashik News Marathi News