भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेऊनही नाशिककरांचे कामे तर होत नाहीत, शिवाय पक्षाच्या प्रतिमेला देखील तडा जात असल्याच्या तक्रारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वंयसेवकांमार्फत पोचल्याने याची दखल घेत मंगळवारी (ता. ९) महापौरांसह तीनही आमदारांना वर्षा निवासस्थानी बोलावून झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत कामे न झाल्यास अल्टिमेटम देण्यात आल्याचे समजते.

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेऊनही नाशिककरांचे कामे तर होत नाहीत, शिवाय पक्षाच्या प्रतिमेला देखील तडा जात असल्याच्या तक्रारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वंयसेवकांमार्फत पोचल्याने याची दखल घेत मंगळवारी (ता. ९) महापौरांसह तीनही आमदारांना वर्षा निवासस्थानी बोलावून झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत कामे न झाल्यास अल्टिमेटम देण्यात आल्याचे समजते.

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. नाशिकरांनी भाजपला बहुमत पार नेऊन ठेवले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाला बहुमत मिळाले. केंद्र, राज्य व महापालिकेत सत्ता असताना शहराचा हवा तसा विकास झाला नाही, याउलट चुकीच्या निर्णयामुळे पक्षाची बदनामी आतापर्यंत झाली आहे. महापालिकेत अधिकाऱ्यांची स्वेच्छानिवृत्तीचे वाढलेले प्रमाण, पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामातील गैरव्यवहार, स्टॅन्डपोस्ट कचरपेटी खरेदी गैरव्यवहार, अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रशासनाच्या कामातील वाढता हस्तक्षेप, बहुमत असूनही भाजपपेक्षा प्रबळ ठरणारी विरोधी शिवसेना, भाजप आमदारांमधील वाढलेली सुंदोपसुंदी, भाजप पदाधिकाऱ्यांमधील वाढते वाद, आजी-माजी आमदारांमधील रुग्णालयावरून निर्माण झालेला वाद, महापालिकेत चुकीच्या पद्धतीने दिले जाणारे ठेके, गरज नसताना २५७ कोटी रुपयांचे रस्ते कामासाठी काढण्यात आलेल्या निविदा या एक ना अनेक कारणांवरून सत्ताधारी भाजपची बदनामी झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक विधानप्रमाणे काम होत नाही.

त्यापूर्वी मराठवाड्याला सोडलेले पाणी, एकलहरे औष्णिक वीज केंद्र, आरोग्य विज्ञान विद्यापीठ हलविण्याचे प्रयत्न, खुंटलेली औद्योगिक प्रगती या एक ना अनेक कारणांवरून नाशिककरांमध्ये भाजप सरकारकडून अन्याय होत असल्याची भावना प्रबळ झाली आहे. बांधकाम क्षेत्राच्या बाबतीत झालेल्या अन्यायाच्या बाबतीत तर भावना अधिक तीव्र आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणुकांची तयारी होत असताना नाशिककरांमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे. पक्षाकडून सर्वेक्षण चालू असताना नकारात्मक बाजू प्रकर्षणाने समोर येऊ लागल्याने भाजप कार्यकर्त्यांसह संघाच्या नेत्यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्याने आज रात्री उशिरा सर्वांना मुंबईत बोलविण्यात आले. बैठकीत झाडाझडती घेण्यात आली. गेल्या दहा महिन्यांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news bjp chief minister office bearer