भाजप शहराध्यक्षांकडून नगरसेवकांना कानपिचक्‍या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नाशिक - स्थायी समितीत मंजूर केलेल्या विषयांवरून सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याविरोधात भूमिका घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांना साथ देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या चार नगरसेवकांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी कानपिचक्‍या देत सबुरीचा सल्ला दिला. 

नाशिक - स्थायी समितीत मंजूर केलेल्या विषयांवरून सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याविरोधात भूमिका घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांना साथ देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या चार नगरसेवकांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी कानपिचक्‍या देत सबुरीचा सल्ला दिला. 

सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभा क्रमांक 16 चे इतिवृत्त नसल्याने नगरसेवकांनी गोंधळ घातला. त्यानंतर नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात आठ कोटींच्या वीजविषयक कामांना मंजुरी दिल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. त्याच दिवशी भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, सूर्यकांत लवटे या शिवसेनेच्या नगरसेवकांबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र महाले व अपक्ष मुशीर सय्यद यांनी स्थायी समितीचे ठराव मंजूर करू नये, असे विरोधाचे पत्र नगरसचिवांना दिले. त्या पत्रावर भाजपच्या मुकेश शहाणे, जगदीश पाटील, ऍड. श्‍याम बडोदे व सुनीता पिंगळे यांचीही स्वाक्षरी असल्याने स्थायी समिती सभापतींविरोधात भाजपच्याच नेत्यांनी बंड पुकारल्याचे समोर आले. स्थायी समितीच्या भाजप सदस्यांमधील वाद शिगेला पोचल्याच्या पार्श्‍वभूमीवर सभापतींविरोधात बंड केलेल्या चारही नगरसेवकांना शहराध्यक्ष सानप यांनी त्यांच्या पंचवटी येथील कार्यालयात आज सकाळी बोलावून घेत कानपिचक्‍या दिल्याचे समजते. पक्षांतर्गत वाद असतील, तर परस्पर भूमिका न घेण्याचा सल्लाही दिल्याचे समजते. 

दरम्यान, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी गैरसमजातून प्रकार घडल्याची सारवासारव केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news bjp corporator