गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

जिल्हा प्रशासनातर्फे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

जिल्हा प्रशासनातर्फे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

नाशिक - श्रावणाच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर ५२ दिवसांमध्ये पहिल्यांदा नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सकाळी आठपासून पुराच्या पातळीत वाढ होण्यास सुरवात झाली आणि भांडी-सराफ बाजारात पाणी पोचले. दीप अमावास्येनिमित्त धार्मिक विधीसाठी आलेल्या यजमानांचे विधी कपालेश्‍वर पोलिस चौकीशेजारील जागेप्रमाणेच वस्त्रांतरगृहात झाले. 

पावसाचा जोर उद्या (ता. २४) दुपारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांमध्ये तालुकानिहाय झालेला पाऊस (कंसात सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये) - नाशिक- ५१ (२०), इगतपुरी- १३८ (३६), दिंडोरी- २७ (२९), पेठ- ९५ (५७), त्र्यंबकेश्‍वर- १५० (४४), मालेगाव- १३ (२), नांदगाव- २ (१०), चांदवड- ८.७ (०), कळवण- ३२ (१९), बागलाण- १२ (६), सुरगाणा- १२०.४ (२७.७), देवळा- १६.४ (२), निफाड- ११.८ (१३.५), सिन्नर- १४ (१३), येवला- २२ (५). तसेच जिल्ह्यातील मोठ्या सात आणि मध्यम १७ अशा २४ प्रकल्पांमधील पाण्याचा साठा ५४ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हेच प्रमाण ४० टक्‍क्‍यांपर्यंत होते.

दरम्यान, जिल्ह्यातील धरणांतून गोदावरीमध्ये सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे जायकवाडीकडे आज सकाळपर्यंत १४ टीएमसी पाणी रवाना झाले होते. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणातून पाणी सोडल्याने जायकवाडीकडे रवाना झालेल्या पाण्यात चार टीएमसीची भर पडली.

आपत्ती व्यवस्थापनास लष्कराची सज्जता
जिल्हा प्रशासनाने पावसाचा जोर कायम राहणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती निवारण विभागाप्रमाणेच लष्कर, पोलिस, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, महापालिका आणि अग्निशमन दलास सज्ज राहण्याविषयी कळविले. यंदाच्या पावसाळ्यात जलसंपदा विभागाने इतर विभागांशी समन्वय ठेवत असताना पावसाची स्थिती लक्षात घेऊन धरणातून टप्प्याटप्प्याने सोडण्याचे धोरण राबविले. त्यामुळे गोदावरीच्या पुराच्या पातळीत वाढ होऊनही गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना नुकसानीला सामोरे जावे लागले नसल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

नाशिकमध्ये गोदावरीतून २० हजार क्‍यूसेक पाण्याचा प्रवाह वाहू लागताच, नदीकाठच्या रहिवाशांना धोका तयार होतो. आज सकाळी रामकुंड परिसरातील व्यावसायिकांना पाणी वाढणार असल्याचे सांगताच एक ते दीड हजार छोट्या व्यावसायिकांनी साहित्य सुरक्षितस्थळी हलविले. मात्र ज्यांनी साहित्य हलविण्यास विलंब केला अशांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. चांदोरी आणि सायखेडा भागात तीस हजार क्‍यूसेकपर्यंत पाणी वाहू लागताच, गोदाकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले गेले. गोदाकाठी अग्निशमन आणि जीवरक्षक दल तैनात करण्यात आले आहे. पाऊस आणि धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या अनुषंगाने अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे हलगर्जी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हलगर्जी केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.

ठळक नोंदी
गोदावरीमधील दुतोंड्या मारुतीच्या डोक्‍यापर्यंत पुराचे पाणी
रामसेतूवरून एकजण वाहून गेल्याची भीती 
सेल्फीसाठी धोक्‍याच्या ठिकाणी तरुणाईला उत्साह अनावर
जायकवाडीसाठी १८ टीएमसी पाणी गोदावरीमधून रवाना
नांदूरमध्यमेश्‍वरमधून ६२ हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग 
इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्‍यात अतिवृष्टी

धरणांमधील विसर्ग (क्‍यूसेकमध्ये) 
गंगापूर- १२ हजार, दारणा- १४ हजार, कडवा- सहा हजार, आळंदी- सहा हजार, वालदेवी- एक हजार, पालखेड- तीन हजार, पुणेगाव- ८०५. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news godavari river flood in first rain