गुंडाप्पाने साकारले राजूच्या चित्रपटनिर्मितीचे स्वप्न

दत्तात्रय ठोंबरे
बुधवार, 17 जानेवारी 2018

नाशिक - लहानपणापासून दोघेही एकाच शाळेत शिकले. दोघांची खूपच गट्टी. त्यातील एक राजू संसारे अन्‌ दुसरा गुंडाप्पा देवकर. गुंडाप्पाचे शिक्षण अर्ध्यावर सुटले. मात्र, काबाडकष्ट करत त्याने बांधकाम व्यावसायिकापर्यंत मजल मारली. राजूला लहानपणापासून नाटक, अभिनयाची आवड. उदरनिर्वाहासाठी राजूने शाळेत सफाई कामगाराचे काम पत्करले. मात्र, त्याला कलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर गुंडाप्पाने राजूच्या चित्रनिर्मितीचे स्वप्न साकारले.

राजूला चित्रपटाची निर्मिती करावी, असे वाटत होते. गुंडाप्पाने निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळली अन्‌ राजू दिग्दर्शक झाला. दोघांनी मिळून "सूर्या और मेहरुनिसा का अधुरा मिलन' या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होतोय. राजू आणि गुंडाप्पा दोघेही देवळाली कॅम्पमधील कॅंटोन्मेंट मराठी मुलांच्या शाळेत शिकले. दोघेही राहायला देवळाली कॅम्पमधील चारणवाडी-व्यंकटेशनगरमध्ये.

पाचवीपर्यंत दोघांनी एकत्र शिक्षण घेतले; पण वडिलांचे निधन झाल्याने गुंडाप्पाला शाळा अर्ध्यावर सोडावी लागली. कुटुंबाची जबाबदारी अंगावर आल्याने त्याने मजुरीला सुरवात केली. चालक, पुरवठादारपासून बांधकाम व्यावसायिकपर्यंतच्या करिअरमध्ये गुंडाप्पाने नाव कमावले. राजू मात्र आपली नाटकाची आवड जोपासत राहिला. उदरनिर्वाहासाठी त्याने सैन्यदलाच्या शाळेत सफाई कामगार म्हणून काम सुरू ठेवले.

आयुष्यात एकदा का होईना चित्रपटाचा दिग्दर्शक व्हायचेच, ही खूणगाठ राजूने मनात पक्की बांधली होती; पण संधी कोण देणार? याची विवंचना कायम सतावत होती. त्याने गुंडाप्पाला चित्रपटाविषयी कल्पना दिली. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्याने राजूला चित्रपट निर्मितीसाठी सर्वतोपरी सहकार्य करायचे ठरविले. आपला मित्र मागे राहू नये म्हणून गुंडाप्पाने लागलीच निर्मात्याची तयारी दर्शविली. त्यानंतर चित्रपटाची तयारी सुरू झाली. सर्व नवोदित मराठी कलाकारांना घेऊन प्रेमकथेवर आधारित रहस्यमय हिंदी चित्रपटाची निर्मिती केली.

वर्गमित्र राजूला लहानपणापासून नाटक, अभिनयाची आवड होती. आम्हा दोघांचीही कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बिकट होती. एकदा त्याने चित्रपट निर्मितीबद्दल चर्चा केली. मात्र, त्याच्यापुढे आर्थिक संकट होते. मी त्याला धीर देत मी तुला पूर्ण सहकार्य करतो, असे सांगितले. आम्हा दोघांचा हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या टप्प्यावर पोचलाय.''
- गुंडाप्पा देवकर (बांधकाम व्यावसायिक)

Web Title: nashik news movie making